Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना पक्षाने स्वीकारले असले तरी आपण त्यांना स्वीकारले नसल्याचं सांगत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना पक्षाने स्वीकारले असले तरी आपण त्यांना स्वीकारले नसल्याचं सांगत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) नेते डॉ. सतीश पाटील (Satish Patil) यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
भाजपमध्ये जाण्याच्या वाटेवर असलेल्या एकनाथ खडसे यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत सहभाग घेतला. त्यावेळी केलेल्या भाषणात आपण राष्ट्रवादी पक्षातच होतो आणि राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी जाहीर केले. तर सतीश पाटील यांच्यावर जाहीर सभेतच एकनाथ खडसेंनी उपरोधिक टीका केली होती.
सतीश पाटलांचा खडसेंवर हल्लाबोल
एकनाथ खडसेंच्या टीकेनंतर डॉ. सतीश पाटील यांनी उत्तर देताना म्हटलं आहे की, राष्ट्रवादी पक्षाने एकनाथ खडसे यांना स्वीकारले असले तरी, आपण त्यांना स्वीकारले नाही. खडसे हे सोयीचे आणि आपल्या कुटुंबाच्या हिताचे राजकारण करत आहेत, असा पलटवार त्यांनी केला आहे. आता एकनाथ खडसे यावर काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शरद पवारांसमोर मोठं आव्हान
राष्ट्रवादी शरद पवार गटात एकनाथ खडसे यांचे पुनरागमन झाल्याने पक्षात दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे यांच्या सारख्या बड्या नेत्याने राष्ट्रवादी पक्षातच राहण्याच्या निर्णयानंतर खडसे आणि माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यात एकजूट घडविण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर असणार आहे. आता एकनाथ खडसे आणि सतीश पाटील यांच्यातील वाद मिटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चंद्रकांत पाटलांची खडसेंवर टीका
दरम्यान एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा निर्णय घेतल्यानंतर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार टीका केली होती. एकनाथ खडसे हे जनतेच्या विकासाचे राजकारण न करता कुटुंबाच्या स्वार्थाचे राजकारण करत आहेत. एकनाथ खडसे हे रंग बदलणारे सरपटणारे प्राणी आहेत. आपण आमदार झाल्याचे त्यांना सहन होत नसल्याने आणि वयामुळे ते भ्रमिष्ट झाले आहेत म्हणून ते काहीही बोलतात आणि वागतात. त्यांना आपण फारसे गंभीरतेने घेत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला तुमचा विरोध होता का? गिरीश महाजनांनी सांगितलं मोठं राजकारण