(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मनुस्मृती सारख्या वैदिक ग्रंथात महिलांचा आदर', न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांच्या दाव्यामुळे वादाला तोंड
Delhi High Court Judge Statement On Manusmriti : दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीं प्रतिभा सिंह यांच्या 'मनुस्मृती' ग्रंथासंदर्भातील नव्या दाव्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे.
Manusmriti Controversy : मनुस्मृती सारख्या वैदिक ग्रंथात महिलांचा आदर आणि सन्मान केला असल्याचं वक्तव्य दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi High Court Judge) न्यायमूर्तीं प्रतिभा सिंह (Justice Pratibha Singh) यांनी केलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भारतात महिलांसाठी सन्मानजनक वागणून दिली जाते. देशात महिलांचा आदर केला जातो, असं सांगताना प्रतिभा सिंह यांनी मनस्मृती या वैदिक ग्रंथाचा संदर्भ दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. प्रतिभा सिंह यांच्या या दाव्यामुळे त्यांच्यावर डाव्या विचारसरणीच्य नेत्यांकडून टीक होत आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीं प्रतिभा सिंह यांनी बुधवारी एका परिषदेला संबोधित करताना हे वक्तव्य केलं आहे. 'विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि गणितातील महिलांची आव्हानं' हा या परिषदेचा विषय होता. या परिषदेला संबोधित करताना त्यांनी म्हटलं आहे की, भारतातील महिला भाग्यवान आहेत. भारतात संस्कृती आणि मनुस्मृती सारख्या ग्रंथांमध्ये महिलांना अतिशय आदराचं स्थान देण्यात आलं आहे. आपल्या पूर्वजांनीही महिलांना आदर आणि सन्मानपूर्वक स्थान दिलं आहे, हे मनुस्मृती सारख्या धर्मग्रंथामध्ये पाहायला मिळतं, असं प्रतिभा सिंह यांनी या कार्यक्रमादरम्यान म्हटलं. दरम्यान मनुस्मृतीच्या उल्लेखामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
भारतात जन्मलेल्या महिला भाग्यवान : प्रतिभा सिंह
प्रतिभा सिंह यांनी या परिषदेला संबोधित करताना दावा केलाय की, 'मनुस्मृती ग्रंथात म्हटलंय, जर तुम्ही स्त्रियांचा आदर आणि सन्मान केला नाही तर तुम्ही केलेल्या सर्व पूजेला काही अर्थ उरणार नाही.' दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा सिंह यांनी पुढे म्हटलं की, 'भारतासारखा देश महिलांच्या नेतृत्वाच्या भूमिकेत प्रगतीशील आहे, हे आपले भाग्य आहे. मी असे म्हणत नाही की, खालच्या स्तरावर महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराकडे आणि वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे, पण उच्च पातळीवर, मध्यम स्तरावर भारतात महिलांना आदर आणि सन्मान मिळताना आपल्याला पाहायला मिळतं. '
न्यायमूर्तींनी या कार्यक्रमात वक्तव्य केलंय की, 'मला वाटतं की आपण भारतातील स्त्रिया धन्य आहोत आणि त्याचं कारण म्हणजे आपल्या धर्मग्रंथांमध्येही नेहमीच स्त्रियांना खूप सन्माननीय स्थान देण्यात आलं आहे. जसे मनुस्मृती ग्रंथात सांगितलंय की, जर तुम्ही स्त्रियांचा आदर आणि सन्मान केला नाही तर तुम्ही करत असलेल्या सर्व पूजापाठाला काही अर्थ नाही. त्यामुळे मला वाटते की आपल्या पूर्वजांना आणि वैदिक धर्मग्रंथांना स्त्रियांचा आदर कसा करायचा हे चांगलेच माहीत होते.'
डाव्या विचारसरणीच्या नेत्यांकडून टीका
नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन (NFIW) संघटनेच्या सरचिटणीस अॅनी राजा यांनी म्हटलंय की, न्यायाधीश प्रतिभा सिंह यांना भारतातील महिलांच्या दयनीय स्थितीची नीट जाणीव नसावी. त्यांच्या विधानातून जातीवाद आणि वर्गवाद दिसून येतो.'