T20 World Cup 2021: भारत-पाक सामन्याला ओवेसींचा विरोध, शहीद जवानांची करून दिली आठवण
नऊ सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही टी 20 खेळणार आहात?
यूएईमध्ये टी-२० विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा सलामीचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या लढतीपूर्वीच भारतामध्ये राजकीय सामना रंगला आहे. एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याला विरोध केला आहे. यावेळी त्यांनी भारत सरकारला पूंछमध्ये 8 दिवसांत शहीद झालेल्या 9 जवानांची आठवण करून दिली.
हैदराबादमध्ये ते एका सभेत बोलत होते. यावेळी ओवेसी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन गोष्टींवर कधीच बोलत नाहीत. एक म्हणजे पेट्रोल-डिझेलची (petrol and diesel prices) वाढणारी किंमत. दुसरी गोष्ट म्हणजे लडाखमध्ये चीनची होणारी घुसखोरी(China in Ladakh). पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनविषयी बोलायला घाबरतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये दररोज वाढ होताना दिसत आहे. काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांच्या सुरु असलेल्या अभियानादरम्यान 9 जवानांना वीरमरण आलं. यावरुनही ओवीसींनी मोदी सरकारवर टीका केली. 8 दिवसांत आपल्या 9 जवान शहीद झाले आहेत अन् २४ ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तानसोबत टी-२० मध्ये मॅच खेळणार आहे.
#WATCH | PM Modi never speaks on 2 things -- rise in petrol and diesel prices & China sitting in our territory in Ladakh. PM is afraid of speaking on China. Our 9 soldiers died (in J&K) & on Oct 24 India-Pakistan T20 match will happen: AIMIM chief Asaduddin Owaisi, in Hyderabad pic.twitter.com/Q0AabFZ0BU
— ANI (@ANI) October 19, 2021
भारतीय सैन्याचे 9 सैनिक मारले गेलेत आणि २४ तारखेला भारत आणि पाकिस्तानचे टी 20 आयोजित करण्याची तयारी करण्यात येत आहे. नऊ सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही टी 20 खेळणार आहात? आज पाकिस्तान काश्मीरमध्ये भारतीयांच्या जीवाशी टी २० खेळत आहे, पण तुम्ही काय करत आहात?, असा सवाल ओवेसी यांनी यावेळी केला. काश्मीरमध्ये पाकिस्तान भारतासोबत 20-20 खेळत आहे. घाटीमध्ये काश्मीरी नागरिकांची हत्या केली जात आहे. हे केंद्रातील भाजप सरकारचं अपयश आहे. प्रवासी मजूरांची हत्या केली जात आहे. देशात असंतोषाचं वातावरण असताना गृहमंत्री अमित शाह काय करत आहेत? गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये नागरिकांची हत्या करण्यात येत आहे. त्यामुळे घाटीमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी भारतीय नागरिकांची आणि जवानांना मारत असताना भारत पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळत आहे, असेही ओवेसी म्हणाले.
विश्वचषकात भारताचे सामने कधी अन् कुणाबरोबर ?
- 24 ऑक्टोबर (रविवार) : भारत विरुद्ध पाकिस्तान : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता
- 31 ऑक्टोबर (रविवार) : भारत विरुद्ध न्यूझिलंड : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता
- 03 नोव्हेंबर (बुधवार) : भारत विरुद्ध अफगाणिस्तान : अबु धाबी : संध्याकाळी 07.30 वाजता
- 05 नोव्हेंबर (शुक्रवार) : भारत विरुद्ध B1 (क्वॉलिफायर) : संध्याकाळी 07.30 वाजता
- 06 नोव्हेंबर (सोमवार) : भारत विरुद्ध A2 (क्वॉलिफायर) : संध्याकाळी 07.30 वाजता