Independence Day : भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला? मध्यरात्रीच घोषणा का? कारण आहे खास
Independence Day History : भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा 15 ऑगस्टच्या मध्यरात्री करण्यात आली आणि ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवून भारताचा तिरंगा फडकवण्यात आला.
मुंबई : इंग्रजांच्या जवळपास 150 वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्या देशाने स्वातंत्र्य मिळवलं आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर युनियन जॅक खाली उतरून तिरंगा फडकवण्यात आला. त्यामुळे 15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी एक खास दिवस. यंदा आपण 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. पण ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देताना 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला? भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा अर्ध्या रात्रीच का करण्यात आली? त्यामागे नेमकं काय कारण आहे? यामागच्या कारणाची मात्र अनेकांना माहिती नाही.
Why 15th August was chosen as Independence Day : 15 ऑगस्टचा दिवस होता खास
ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून भारत स्वातंत्र झाला तेव्हा लॉर्ड माउंटबॅटन हे व्हाईसरॉय होते. लॉर्ड माउंटबॅटन यांचा नशिबावर विश्वास होता. 15 ऑगस्ट ही तारीख आपल्यासाठी लकी आहे असा त्यांचा विश्वास होता. कारण याच तारखेला म्हणजेच 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानी सैन्याने ब्रिटिशांसमोर आत्मसमर्पण केलं होतं. त्यावेळी माऊंटबॅटन हे मित्र राष्ट्रांचे कमांडर होते. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धातील विजयाच्या नायकांमध्ये माऊंटबॅटन यांची गणना होते. यामुळेच जेव्हा भारताला स्वातंत्र्य देण्याची चर्चा झाली तेव्हा माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट ही तारीख निवडली.
मध्यरात्री स्वातंत्र्य का घोषित करण्यात आलं?
भारताला 15 ऑगस्टच्या मध्यरात्री स्वातंत्र्य मिळालं. मध्यरात्री स्वातंत्र्य देण्यामागे अनेक कारणे होती. पाकिस्तान आणि भारताची फाळणी हे त्याचे एक कारण होते. त्यावेळी ब्रिटिश सरकारला भीती वाटत होती की जर स्वातंत्र्याच्या दिवशीच भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तर त्यातून दंगली होतील आणि कायदा व सुव्यवस्था नियंत्रित करणे कठीण होईल. या कारणास्तव भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा ही मध्यरात्री करण्यात आली.
दुसरा युक्तिवाद असा आहे की पाकिस्तानला भारताच्या एक दिवस आधी म्हणजेच 14 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले. 14 ऑगस्ट रोजी व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांना पाकिस्तामध्ये कराचीला जावं लागणार होतं आणि ते रात्री उशिरा भारतात परतणार होते. यामुळेच त्या मध्यरात्रीच भारताला स्वातंत्र्य मिळणार हे ठरले होते.
परंतु वस्तुस्थिती दर्शविते की ब्रिटीश सरकारने 15 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान आणि भारत अशी दोन्ही राष्ट्रे एकाच वेळी स्वतंत्र होतील अशी घोषणा केली होती. यामुळेच मध्यरात्री नवी दिल्लीत भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली.