कोण आहेत नानाजी देशमुख?
नानाजींनी प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कार्य केलं. पुढे काही वर्षे त्यांनी देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिका निभावली. राजकारण किंवा सत्ताकारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन अखेरीस समाजकार्य करायचे ठरवले.
मुंबई : चंडिकादास अमृतराव देशमुख ऊर्फ नानाजी देशमुख यांचा जन्म 11 ऑक्टोबर, 1916 मध्ये हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी झाला. तर 27 फेब्रुवारी 2010 मध्ये त्यांचा निधन झालं. नानाजी देशमुख यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार देऊन सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
नानाजींनी प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कार्य केलं. पुढे काही वर्षे त्यांनी देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिका निभावली. राजकारण किंवा सत्ताकारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन अखेरीस समाजकार्य करायचे ठरवले.
नानाजी देशमुख सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात पूर्णवेळ कार्यकर्ते होते. त्यानंतर नानाजींनी संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चारित्र्याच्या आधारावर एक नवीन राजकीय पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच जनसंघाची स्थापना झाली.
दीनदयाळ उपाध्याय, सुंदरलाल भंडारी, अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत नानाजी जनसंघ पक्षाच्या माध्यमातून कार्यरत होते. त्यानंतर जनता पक्षाच्या माध्यमातूनही ते राजकारणात सक्रिय झाले. पांचजन्य, राष्ट्रधर्म व स्वदेस या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिले.
सामाजिक कार्य
- दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून उत्तर प्रदेशामधील गोंडा जिल्ह्यात सिंचनाचे कार्य केले.
- सुमारे 40 हजार कूपनलिकांच्या माध्यामातून शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचं काम केले.
- पाणी अडवा-पाणी जिरवा या माध्यमातून सिंचनक्षेत्रात वाढ केली.
- चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय हे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन केले.
- आरोग्यधाम व गोशाळा उद्यमिता विद्यापीठ, ग्रामोद्योग विद्यालय, आश्रमशाळा गुरुकुल, ग्रंथालय, मातृसदन, दंतचिकित्सा केंद्र इत्यादी त्यांनी 'चित्रकूट'मध्ये उभारली.
- 1990 दरम्यान मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील प्रत्येकी सुमारे 250 गावं दत्तक घेऊन त्यांचा विकास केला.
राजकीय कारकिर्द
आणीबाणीनंतरच्या काळात 1977 मध्ये नानाजी काही काळ लोकसभेचे सदस्य होते. तर 1999 मध्ये त्यांची राज्यसभेवरही निवड करण्यात आली.
पुरस्कार
सरकारने याआधी त्यांच्या कार्याचा 'पद्मविभूषण' पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. तर 1997 मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना 'डॉक्टर ऑफ लेटर्स' ही पदवी प्रदान केली.