अलिगड विद्यापीठात जिना यांचा फोटो असण्यात गैर काय?- हमीद अन्सारी
कोलकातामध्ये व्हिक्टोरिया मेमोरिअल होऊ शकतं मग अलिगढ मुस्लीम विद्यापीठात जिना यांचा फोटो असणं यात चूक काय? असा सवाल अन्सारी यांनी उपस्थित केला आहे.
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या फाळणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मोहम्मद अली जिना यांच्या फोटोवरुन पुन्हा वाद सुरु झाला आहे. यावेळी माजी उप-राष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी या विषयाला हात घातला आहे. कोलकातामध्ये व्हिक्टोरिया मेमोरिअल होऊ शकतं, मग अलिगड मुस्लीम विद्यापीठात जिना यांचा फोटो असणं यात चूक काय? असा सवाल अन्सारी यांनी उपस्थित केला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हमीद अन्सारी यांनी आपली भूमिका मांडली. 'विद्यापीठांमध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचा विद्यार्थी संघटनांकडून सन्मान करण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. सर्वात आधी महात्मा गांधी यांचा अशा प्रकारे सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर मोरारजी देसाई, मदर टेरेसा आणि खान अब्दुल गफार खान यांना सन्मानित करण्यात आलं होतं आणि त्यांचे फोटो विद्यापीठात लावण्यात आले होते', असं अन्सारी यांनी सांगितलं.
'विद्यापीठाच्या परंपरेनुसार मोहम्मद जिना यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांचा फोटो अलिगड विद्यापीठात लावण्यात आला होता. जिना 1938मध्ये त्या ठिकाणी गेले होते. त्यामुळे त्याठिकाणी त्यांचा फोटो असण्यात काहीही गैर नाही. व्हिक्टोरिया स्मारक असू शकतं, तर जिनांचा फोटो का नको?' असा सवाल हमीद अन्सारी यांनी यावेळी विचारला.
अलिगड विद्यापीठात काही महिन्यांपूर्वी जिना याच्या फोटोवरून वादंग उठलं होतं. भाजपचे खासदार सतीश गौतम यांनी अलिगड विद्यापीठाच्या कुलपतींना चिठ्ठी लिहून जिना यांचा फोटो हॉलमध्ये का लावण्यात आला आहे? अशी विचारणा केली होती.
हिंदुत्वावादी संघटनांनी यानंतर जिना यांचा फोटो हटवण्यासाठी आंदोलनं सुरु केली. या दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला होता आणि या प्रकरणाने व्यापक स्वरुप घेतलं होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते.