मुर्शिदाबादमध्ये केंद्रीय सुरक्षा बल तैनात करा, हायकोर्टाचे निर्देश; हिंसाचाराच्या घटनेत 3 जणांचा मृत्यू
मुर्शिदाबाद येथील आंदोलन हिंसक झाले असून पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या आहेत. तर, सार्वजनिक संपत्तीचेही नुकसान करण्यात आले आहे

कोलकाता : केंद्र सरकारने वक्फ बोर्ड विधेयक (waqf board) संसदेत मंजूर करुन घेतल्याने आता देशभरात वक्फ जमिनींसंदर्भात नव्या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. देशाच्या संसदेत या कायद्यावर दोन्ही बाजुंनी चर्चा झाली. त्यावेळी, हा कायदा मुस्लिमांविरुद्ध असल्याचे मत मांडत काहींनी विधेयकास विरोध केला. मात्र, बहुमताच्या जोरावर हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे, आता या विधेयकावरुन रस्त्यावर उतरुन विरोध करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे वक्फ बोर्ड विधेयकास विरोध करत उभारलेल्या आंदोलनास हिंसक वळण लागलं आहे. येथील आंदोलनात आत्तापर्यत 3 जणांचा मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी जाळपोळीची घटना घडली आहे. त्यामुळे, कोलकाता उच्च न्यायालयाकडून (Highcourt) CRPF ला तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुर्शिदाबाद येथील आंदोलन हिंसक झाले असून पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या आहेत. तर, सार्वजनिक संपत्तीचेही नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे, भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी शुक्रवारी ताततडीने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन केंद्रीय सुरक्षा बदलास पाचारण करण्याची विनंती केली होती. अखेर, हायकोर्टाने ही याचिका मान्य करत, हिंसाचारग्रस्त भागात केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. जेव्हा अशा घटना घडतात, असे आरोप समोर येतात तेव्हा न्यायालय डोळे बंद करू शकत नाही. गरज भासल्यास केंद्रीय सुरक्षा बलास आणखी काही ठिकाणी तैनात करण्याचे आदेशही न्यायालय देईल, असे हायकोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे, आता लवकरच मुर्शिदाबादमधील हिंसाचारग्रस्त भागात केंद्रीय सुरक्षा बल तैनात होईल.
मुर्शिदाबाद येथील हिंसाचाराच्या घटनेवरुन आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी आरोप केला आहे की, बीएसएफ हिंसाचाराच्या ठिकाणी वेळेत पोहोचले होते, पण जिल्हाधिकाऱ्यांनी हिंसाचाराची घटना थांबविण्यासाठी त्यांना मनाई केली. हिंसाचार प्रभावित शमशेरगंज परिसरात जाफराबाद येथील एका घरात वडील आणि मुलाचा मृतदेह आढळून आला आहे, ज्यांच्या शरीरावर चाकूने वार केल्याचा खुणा दिसत आहेत. तर, धुलियान येथेही एका व्यक्तीचा गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे, हिंसाचाराच्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
केद्रीयमंत्र्यांचे राज्य सरकारवर आरोप
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवरही केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते सुकांत मुजूमदार यांनी गंभीर आरोप केले आहेत. शमशेरगंज, सुती आणि जंगीपुर येथे हिंदूंवर अत्याचार होत असताना राज्यातील ममता बॅनर्जी यांचं सरकार डोळे बंद करुन बसले आहे. हिंसाचारग्रस्त परिसरात, तणावग्रस्त भागात शांतता राखण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कडक भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
























