Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट, महाराष्ट्रासह 'या' भागात पावसाची शक्यता; शेतकऱ्यांवरील संकट कायम
IMD Weather Forecast : महाराष्ट्रासह दक्षिण भारतात आज पावसाची शक्यता आहे. तर उत्तर भारतात थंडी वाढण्याची शक्यता आहे.
Weather Update Today : देशभरात थंडीचा कडाका (Cold Weather) वाढताना दिसत आहे. पुढील 48 तासांत देशातील विविध भागात पावसाची रिमझिम (Rain Alert) पाहायला मिळणार आहे. मिचॉन्ग चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असला तरी पुढील दोन दिवस महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. उत्तर भारतात थंडी वाढताना दिसत आहे. तर दक्षिण भारतात पुढील 24 तासांत मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्वेकडील भागात धुक्याची चादर पाहायला मिळणार असून तापमानातही घट झाल्याचं पाहायला मिळेल.
उत्तर भारतात थंडीची लाट
उत्तर भारतात येत्या काही दिवसात तापमानात घट होईल. 15 डिसेंबरपासून थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये आज धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे. आयएमडीने सिक्किममध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. बिहार, राजस्थान, झारखंड भागात पारा घसरणार आहे. दिल्लीमध्येही आठवडाभर धुके आणि थंडी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
'या' भागात पावसाची शक्यता
आज दक्षिण भारतात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप भागात हलका ते मध्य स्वरुपाचा पाऊस पाहायला मिळेल. यासोबतच नागालँड आणि अरुणाचल प्रदेशातही पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भ आणि कोकणात रिमझिम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आयअमडीने वर्तवली आहे.
बदलत्या हवामानात तब्येतीची काळजी घ्या
गेल्या काही दिवसांपासून काही भागात ईशान्य मान्सूनचा जोर वाढत होता. केरळसह दक्षिणेकडील भागांमध्ये आणखी दोन दिवस मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाडज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशाच्या उर्वरित भागात बहुतेक हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. हवामानातील बदल पाहता नागरिकांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. तापमानात घट झाल्यामुळे खोकला, सर्दी, ताप यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
काश्मीरमध्ये हाडं गोठवणारी थंडी
काश्मीरमध्ये हाडे गोठवणारी थंडी सुरू झाली आहे. काश्मीर खोऱ्यातील अनेक भागात पारा शून्याच्या खाली अनेक अंशांवर पोहोचला आहे. श्रीनगर हे काश्मीरमधील सर्वात थंड ठिकाण देखील होते, जिथे तापमान शून्यापेक्षा 5 अंशांच्या खाली पोहोचले होते. 16 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण असेल, पण हवामान प्रामुख्याने कोरडे राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. रात्रीच्या तापमानात काही अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.