Weather Update : अवकाळी पाऊस आणि थंडीपासून दिलासा, राज्यासह देशात आजचं हवामान कसं असेल?
IMD Weather Forecast : राज्यासह देशातील नागरिकांना अवकाळी पाऊस आणि थंडीपासून दिलासा मिळणार आहे. हवामानात बदल होणार असून आजचं हवामान कसं असेल, हे जाणून घ्या.
Weather Update Today : गेल्या काही दिवसांपासून देशात विविध ठिकाणी पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळत होती. ऐन हिवाळ्यात (Winter) अवकाळी पावसानं हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली, तर शेतकऱ्यांची चिंता वाढली. आता हवामान बदल पाहायला मिळणार आहे. राज्यासह देशातील नागरिकांना अवकाळी पाऊस आणि थंडीपासून दिलासा मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आता देशातून थंडीचा जोर कमी होणार आहे. अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि वेस्टर्न डिस्टबर्न्सचा परिणाम देशातील हवामानावर पाहायला मिळणार आहे.
कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळणार
गेल्या काही दिवसांपासून थंडीने गारलेल्या उत्तर भारतातील नागरिकांना आता कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पुढील 6 ते 7 दिवस तापमानात किंचित वाढ पाहायला मिळेल. शुक्रवारपासून दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्ये तापमान 20 अंशांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी, पहाटे आणि रात्री थंडीचा प्रभाव दिसून येईल. पर्वतीय भागातील कमी बर्फवृष्टीमुळे यावेळी हिवाळा जास्त काळ टिकणार नाही, असंही आयएमडीने म्हटलं आहे.
थंडीचं प्रमाण कमी होणार
भारतीय हवामान खात्याने (India Meteorological Department) थंड वातावरणात उत्तर भारतात दाट धुक्याचा इशारा जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज आकाश निरभ्र असेल. सकाळी हलके धुके असेल. दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरण असेल. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आतापासून उत्तर-पश्चिम भारतात थंडीचे दिवस आणि कडक थंडीचे प्रमाण कमी होणार आहे. पुढील चार ते पाच दिवस सकाळी आणि रात्री दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे.
'या' भागात पावसाची शक्यता
देशाच्या बहुतांश भागात कोरडं वातावरण राहणार असून हवामानात फारसा बदल होणार नाही. काही भाग वगळता जवळपास संपूर्ण देशात कोरडे हवामान राहील. काही ठिकाणी थंडी, धुके, काही ठिकाणी दंव आणि अंशतः ढगाळ आकाश राहील. आज दक्षिण तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आजचं हवामान कसं असेल?
उत्तर राजस्थानमध्ये सकाळी काही ठिकाणी दाट ते दाट धुके पडण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, जम्मू विभाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर मध्य प्रदेश, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी दाट धुके पडू शकते. पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही ठिकाणी थंडीची शक्यता आहे