Weather Update : हिवाळ्यात पावसाळा! महाराष्ट्रासह 'या' राज्यांना अवकाळी पावसाचा धोका; IMD चा अंदाज
IMD Forecast Today : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशात 5 जानेवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Today Weather IMD Update : देशात सध्या हिवाळ्यात (Winter) पावसाळा (Rain) अनुभवायला मिळत आहे. उत्तर भारत आणि मध्य भारतात (Cold Wave) सध्या तापमानात कमालीची घट (Temperature Drops) झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये आज अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण भारतात थंडीची लाट (Cold Weather) पाहायला मिळत आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, राज्यासह देशात 5 जानेवारीपर्यंत काही राज्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला (Rain Prediction) मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 5 ते 11 जानेवारी दरम्यान बहुतेक राज्यांमध्ये तापमान सामान्यपेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे.
काही राज्यांमध्ये दाट धुक्याची चादर
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस देशात विविध राज्यांमध्ये दाट धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये 5 जानेवारीपर्यंत धुक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दृष्यमानता कमी झाल्यामुळे वाहतूक सेवाही विस्कळीत झाली आहे. रेल्वे आणि विमान उड्डाणावरही परिणाम झाला आहे.
थंडीमुळे अनेक राज्यांमध्ये शाळा बंद
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच देशात थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि धुक्यामुळे अनेक राज्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे हवामान खात्यानेही अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये शाळा बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले. अनेक गाड्या आणि विमानांचे मार्गही वळवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने 31 डिसेंबर ते 14 जानेवारी 2024 पर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते. याशिवाय राजस्थानमधील अनेक भागात कडाक्याच्या थंडीमुळे 5 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. हरियाणामध्ये 15 जानेवारीपर्यंत हिवाळी सुट्टी देण्यात आली आहे.
देशात आज आणि उद्या हवामान कसं असेल?
हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 5 जानेवारीपर्यंत पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये रात्री आणि सकाळच्या वेळी दाट धुके राहण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या राजस्थानच्या काही भागांमध्ये पहाटेच्या वेळेस, तसेच 3 जानेवारी रोजी उत्तर मध्य प्रदेशातील एकाकी भागात दाट ते अत्यंत दाट धुके राहण्याची शक्यता आहे. थंड दिवस ते तीव्र थंड दिवस अशी स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागात 3 जानेवारीला आणि काही भागात 4 जानेवारीला थंडी वाढण्याचा अंदाज आहे.
कुठे पाऊस, तर कुठे बर्फवृष्टी
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे बाष्पाचे ढग तयार होऊन देशात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू आणि केरळमध्ये काही भागात आज पावसाची शक्यता आहे. काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेशच्या मैदानी भागात 6 जानेवारीपर्यंत दाट धुके राहणार असून आयएमडीकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.