Weather Update: उत्तर भारतात उन्हाचा प्रकोप, 15 एप्रिलनंतर राजस्थानसह झारखंड आणि यूपीमध्ये उष्णतेची लाट
देशात उन्हाचा चटका वाढल्याने नागरिकांना त्रास होत आहे. उत्तर भारतातील बहुतांश शहरांना सध्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हामुळे लोकांना घराच्या बाहेर पडणे कठीण झाले आहे.
Weather Update: सध्या देशात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. देशात उन्हाचा चटका वाढल्याने नागरिकांना त्रास होत आहे. उत्तर भारतातील बहुतांश शहरांना सध्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हामुळे लोकांना घराच्या बाहेर पडणे कठीण झाले आहे. उन्हापासून वाचण्यासाठी बहुतांश लोक घरातच थांबणे पसंत करत आहेत. दरम्यान, राजधानी दिल्लीत वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. आज कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसासह गारपिटीचीही शक्यता हवामान विभागनं वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या चार-पाच दिवस देशाच्या वायव्य भागात लोकांना उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. मात्र, राजधानी दिल्लीत लवकरच उष्णतेच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. दिल्लीत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच उष्णतेने सर्व विक्रम मोडायला सुरुवात केली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, वाढत्या उष्णतेने एप्रिलमध्ये गेल्या 72 वर्षांचा विक्रम मोडला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 15 एप्रिलनंतर उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळू शकतो.
झारखंडमध्ये उन्हाचा चटका वाढला
झारखंडमध्ये देखील सध्या चांगलाच उन्हाचा चटका जाणवत आहे. झारखंडमधील उष्णता विक्रम करण्याच्या मार्गावर आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, झारखंडमध्ये 9 एप्रिलचा उन्हाचा पारा 44 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. त्यानंतर 10 एप्रिलला 44.8 डिग्री सेल्सिअस, 11 एप्रिलला 44.02 डिग्री सेल्सिअस आणि 12 एप्रिलला पुन्हा 44.8 डिग्री सेल्सियसवर पोहोचला होता. त्याचवेळी, हवामान विभागाने येत्या काही दिवसांत उष्मा वाढेल आणि लोकांना उष्ण वाऱ्याचाही सामना करावा लागू शकतो असे सांगितले होते.
राजस्थानमध्ये उष्णतेची लाट
राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे. इथं उकाडा इतका आहे की, काल बाडमेर जिल्ह्याचा पारा 44 अंशांच्या जवळ गेला होता. ऊन आणि सोसाट्याचा वारा यामुळे लोक आजारी पडू लागले आहेत. दुपारनंतर राजस्थानचे रस्ते मोकळे दिसत आहेत. त्याचबरोबर या उकाड्यापासून वाचण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये देखील उष्णतेमुळे लोकांना त्रास जाणवत आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. दरम्यान, तूर्तास तरी तापमान कमी होणार अशी स्थिती नसल्याच हवामान विभागाने सांगितले आहे. 15 एप्रिलनंतर राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णता आणखी वाढू शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: