(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weather Update : पुढील 5 दिवस उत्तर भारतासह अनेक राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही देशाच्या राजधानीसह विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Weather Update : देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. विशेषत: उत्तर भारतात (North India) पावसाचा जोर अधिक आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही देशाच्या राजधानीसह विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाहुयात आज कुठे कुठे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या राज्यात जोरदार पावसाची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. कारण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्येही मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील 12 पैकी आठ जिल्ह्यांमध्ये 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यात 25 आणि 26 ऑगस्टला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय तेलंगणा, मराठवाडा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड, गंगा पश्चिम बंगाल, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश, अंतर्गत कर्नाटक, केरळमध्ये हलका पाऊस पडू शकतो.
मध्य प्रदेशसह राजस्थानमध्येही पावसाची शक्यता
मध्य प्रदेशातही 15 ऑगस्टपासून मान्सून सक्रीय झाला झाला आहे.त्यामुळं तिथेही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच छत्तीसगडमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील जोधपूर, बिकानेर, झालावाड, पालीसह अनेक भागात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडू शकतो.
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत
उत्तराखंडमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील नद्या दुथडी भरून वाहत असून, त्यामुळं पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात होत असलेल्या भूस्खलनामुळं अनेक रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर अनेक ठिकाणी शेती पिकांना देखील फटका बसला आहे. आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील पाच दिवस ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: