India Weather Update : कुठे पाऊस तर कुठे बर्फवृष्टी, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज..
Weather In India : उत्तर भारतातील (North India) अनेक भागात रात्री उशिरा जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसानं (Rain) हजेरी लावली.
Weather In India : उत्तर भारतातील (North India) अनेक भागात रात्री उशिरा जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसानं (Rain) हजेरी लावली. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळं हवामानात झपाट्यानं बदल होत आहे. राजधानी दिल्लीच्या (Delhi)नैऋत्य भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, आजही (25 जानेवारी) हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
पुढील काही दिवस दिल्लीत हलक्या पावसाचा अंदाज
दिल्लीतील सफदरगंजमध्ये जानेवारीमध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे. मात्र, गतवर्षी जानेवारी महिन्यात 88.2 मिमी पाऊस पडला होता. जो आत्तापेक्षा 306 टक्क्यांनी अधिक होता. त्याचप्रमाणं जानेवारी 2021 मध्ये 161 टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली होती. मात्र, पुढील काही दिवस दिल्लीत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
'या' राज्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा
हवामान विभागानं उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावासाचा इशारा दिला आहे. तसेच काही ठिकाणी वर्फवृष्टी होण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. डोंगराळ राज्यांमध्ये जोरदार हिमवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये तापमानात वाढ होणार आहे. लेह लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबादसह उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी झाली आहे.
गोव्यात ढगाळ वातावरण
गोव्यात सकाळपासूनच अंशतः ढगाळ वातावरण होते. भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आज (25 जानेवारी) गोव्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. काही आठवड्यांहून अधिक काळ हवामान कोरडे होते. मागील काही दिवसांपासून हलक्या सरी बरसल्यानं येथील वातावरण आल्हाददायक झाले होते.
जानेवारीच्या सुरुवातील थंडीचा कडाका शेवटी मात्र पावसाची हजेरी
येत्या काही दिवसांत उत्तर-पश्चिम भारतातील अनेक भागांत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 24 ते 26 जानेवारी दरम्यान डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि मैदानी भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे उत्तर भारतात पावसानं हजेरी लावली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला राजधानी दिल्लीला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. दिल्लीत अनेक दशकांचे रेकॉर्ड अचानक मोडू लागले. संपूर्ण उत्तर भारत धुक्याच्या गर्तेत होता. मात्र, आता गोठवणाऱ्या थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: