(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weather Update : राज्यात हुडहुडी! पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; आजचं हवामान कसं असेल जाणून घ्या
IMD Weather Forecast : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे देशात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
Weather Update Today : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा (Cyclone) परिणाम देशातील हवामानावर दिसून येत आहे. राज्यासह देशात वातावरणात घट झाली आहे. पुढील 24 तासांत देशातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक भागात आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. केरळ, माहे, अंदमान आणि निकोबार बेटांवर आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलवरील वेगळ्या ठिकाणी लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे. केरळमध्ये कोझिकोड, तिरुवनथपुरम, कोट्टायम, इडुक्की, त्रिशूर तर तामिळनाडूमध्ये नागपट्टिनम, थुथुकुडी, कराईकल या भागात आजही पावसाची शक्यता आहे.
थंडीचा कडाका वाढला
देशभरातील हवामानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. थंडीचा जोर वाढला आहे. छत्तीसगड, तेलंगणा, रायलसीमा, किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात बहुतांश ठिकाणी तापमान घसरल्याने लोक शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत. झारखंड आणि आसाम आणि मेघालयमध्ये अनेक ठिकाणी, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारमधील तापमानातही घट झाली आहे. जम्मू-काश्मीरसह हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीची शक्यता आहे. गोवा, केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही धुक्याची चादर पसरली असून थंडीचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे, कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रासह इतर भागातही तापमानात घट झाली आहे. महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा वाढला आहे.
चक्रीवादळाचा हवामानावर परिणाम
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे देशात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आज आणि उद्या तामिळनाडू आणि केरळमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कर्नाटकमध्ये 22 आणि 23 नोव्हेंबर पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी दाट धुक्याची चादरही पाहायला मिळणार आहे.
पर्वतीय भागात बर्फवृष्टी
पर्वतीय भागात हलकी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. 23 नोव्हेंबर रोजी पश्चिम हिमालय पर्वताच्या वरच्या भागात हलका पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. पर्वतीय भागात सक्रिय असलेले वेस्टर्न डिस्टर्बन्स आता दिल्लीपासून दूर जात असून त्यामुळे तापमानात घट होणार आहे. आगामी आठवड्याच्या शेवटी गुजरातमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक आणि केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.