(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WB Election 2021: ममता सरकारमधील मंत्री झाकीर हुसैन यांच्यावर बॉम्ब हल्ला, घटनेने खळबळ
WEST BENGAL Election 2021: पश्चिम बंगालमधील राजकारण तापलं असताना आता ममता सरकारमधील एका मंत्र्यांवर बॉम्बहल्ल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात निमटीटा रेल्वे स्टेशनवर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात कामगार राज्यमंत्री झाकीर हुसैन गंभीर जखमी झाले आहेत
मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालमधील राजकारण तापलं असताना आता ममता सरकारमधील एका मंत्र्यांवर बॉम्बहल्ल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात निमटीटा रेल्वे स्टेशनवर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात कामगार राज्यमंत्री झाकीर हुसैन गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री हुसैन यांच्यासह आणखी दोन जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. ही घटना काल रात्री घडली असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शाह आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याआधी घडलेल्या या घटनेमुळं प्रशासन सतर्क झालं आहे.
मंत्री झाकीर हुसैन यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. झाकीर हुसैन यांनी 2016 मध्ये जंगीपूर विधानसभा क्षेत्रातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. पोलिसांनी सांगितलं की, कामगार राज्यमंत्री मुर्शिदाबाद जिल्ह्यात निमटीटा रेल्वे स्टेशनवरील 2 नंबर प्लॅटफॉर्मवर रात्री 10 वाजता कोलकाताला जाणाऱ्या गाडीची वाट पाहात होते. त्याचवेळी हा हल्ला झाला. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यासह अन्य दोन जखमींना उपविभागीय हॉस्पीटलला नेण्यात आले, तिथून त्यांना कोलकात्याला हलवले आहे. घटनेनंतर पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये एप्रिल- मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलं आहे. मागील काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी भाजप नेते बाबू मास्टर यांच्या गाडीवर बॉम्ब हल्ला केला होता. यात ते जखमी झाले होते.