Waqf Amendment Bill 2025: विरोधकांचा गोंधळ, अमित शाह यांचं आक्रमक भाषण; मध्यरात्री 2.30 वाजता वक्फ विधेयक मंजूर, राज्यसभेत काय काय घडलं?
Waqf Amendment Bill 2025: वक्फ सुधारणा विधेयकाच्या राज्यसभेतील चर्चावेळी विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला होता.

Waqf Amendment Bill 2025 नवी दिल्ली: लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयकाला (Waqf Amendment Bill Rajyasabha 2025) मंजुरी मिळाली असून आता ते राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हे विधेयक कायद्यात रुपांतर होईल. राज्यसभेत या विधेयकावर जोरदार चर्चा झाली. त्यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी मध्यरात्री 2 वाजून 32 मिनिटाला राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केली.
राज्यसभेतील 128 खासदारांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केले, तर 95 खासदारांनी विरोधात मत दिले. सरकारच्या मते, या विधेयकामुळे वक्फ संपत्तींच्या संरक्षणाला बळ मिळेल, तर विरोधकांनी हे विधेयक काही समुदायांवर अन्याय करणारे असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, राज्यसभेचं कामकाज आज (4 एप्रिल) पहाटे 4 वाजेपर्यंत सुरु होतं. वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीवर राज्यसभेत चर्चा करण्यात आली.
The Waqf (Amendment) Bill, 2025 passed in the Rajya Sabha; 128 votes in favour of the Bill, 95 votes against the Bill #WaqfAmendmentBill pic.twitter.com/WN8ZNMVvvP
— ANI (@ANI) April 3, 2025
वक्फ सुधारणा विधेयकाच्या राज्यसभेतील चर्चावेळी विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला होता. वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत सुमारे 12 तास चर्चा झाली. वक्फ सुधारणा विधेयक अन्याय करणारे असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. तर केंद्रीय गृहमंत्री यांनी राज्यसभेत आक्रमक भाषण केलं. त्यानंतर मध्यरात्री मतदान घेण्यात आलं आणि मध्यरात्री 2.30 वाजता वक्फ विधेयक मंजूर झाल्याचं सभापती जगदीप धनखड यांनी सांगितले.
वक्फ सुधारणा विधेयकात अनेक त्रुटी- मल्लिकार्जुन खरगे
राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, या विधेयकात अनेक त्रुटी आहेत. वक्फ दुरुस्ती विधेयक अल्पसंख्याकांना त्रास देण्यासाठी आणले गेले आहे, असा आरोपही मल्लिकार्जु खरगे यांनी केला.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी शरद पवारांची अनुपस्थिती-
वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेतले दोन खासदार आणि राज्यसभेत स्वतः शरद पवार अनुपस्थित होते. महत्त्वाच्या विधेयकावेळी अनुपस्थित राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झालीय. बुधवारी वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडलं गेलं आणि मंजूर झालं. मात्र लोकसभेत या बिलाच्या मतदानावेळी खासदार अमोल कोल्हे आणि सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांची सभागृहात अनुपस्थितीत होती. तसंच वक्फ सुधारणा विधेयकाच्या संदर्भात जेपीसीच्या काही बैठकांनाही बाळ्यामामा अनुपस्थित राहिले अशी माहिती समोर आली आहे.
























