Corona | उत्तर प्रदेशात लसीकरणाचा सावळा गोंधळ, तीन महिलांना दिली कोविडच्या ठिकाणी रेबिजची लस
कोरोनाच्या लसीच्या ( Corona vaccine) ठिकाणी रेबिजची लस (rabies vaccine ) दिल्याच्या प्रकाराची चौकशी आता जिल्हा मॅजिस्ट्रेटकडून करणार असल्याचं उत्तर प्रदेश सरकारनं सांगितलंय.
लखनऊ : उत्तर प्रदेशात कोरोनाच्या लसीकरणाचा सावळा गोंधळ समोर आलाय. तीन महिलांना कोरोनाची लस द्यायच्या बदल्यात प्राण्यांनी चावल्यावर देण्यात येणारी रेबिजची लस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना पूर्व उत्तर प्रदेशातील शामली या ठिकाणी घडली आहे.
तीन प्रौढ महिला कोरोनाच्या लसीकरणासाठी केंद्रावर गेल्या होत्या. पण त्या ठिकाणी त्यांना कोरोनाची लस न देता रेबिजची लस देण्यात आली. आता या घटनेची चौकशी जिल्हा मॅजिस्ट्रेट करणार असून या प्रकरणी त्यांनी एका फार्मासिस्टला निलंबित केलं आहे. तसेच शुक्रावारी कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या वैद्यकीय अधीक्षकांना या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
स्थानिक सूत्रांच्या मते, त्या तीन पैकी एका महिलेला ही लस घेतल्यानंतर जास्तच त्रास जाणवू लागला. ती जेव्हा स्थानिक डॉक्टरांकडे गेली आणि तिला देण्यात आलेल्या लसीची पावती दाखवली त्यावेळी संबंधित महिलेला रेबिजची लस देण्यात आल्याचं स्पष्ट झालं.
कोरोना लसीकरणाच्या रांगेत न उभारता जनरल रांगेत उभारल्या
यावर तक्रार करण्यात आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने असा प्रकार का घडला याचा खुलासा केला. संबंधित महिला या कोरोनाच्या लसीकरणाच्या रांगेमध्ये न राहता त्या जनरल ओपीडीच्या रांगेत राहिल्याने त्यांना रेबिजची लस देण्यात आल्याचं अजब उत्तर प्रशासनाने दिलं आहे. लस देताना त्यांच्याकडे आधारचीही मागणी करण्यात आली नाही. आता या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून चीफ मेडिकल ऑफिसर यांना आज संध्याकाळपर्यंत आपला अहवाल सादर करायला सांगितला आहे. या प्रकरणी जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :