Twin Towers Demolition : तब्बल 9 वर्षांची कायदेशीर लढाई अन् फक्त 9 सेकंदात ट्विन टॉवर्स जमीनदोस्त
Uttar Pradesh Noida Twin Towers Demolition : तब्बल 9 वर्षांचा कायदेशीर लढ्यानंतर अवघ्या 9 सेकंदांमध्ये जमीनदोस्त होणार ट्विन टॉवर्स. जाणून घ्या उपायोजना सविस्तर
![Twin Towers Demolition : तब्बल 9 वर्षांची कायदेशीर लढाई अन् फक्त 9 सेकंदात ट्विन टॉवर्स जमीनदोस्त Uttar Pradesh Noida Twin Towers Demolition Stage set for Noida twin tower demolition as CBRI clears Supertech's structural audit report Twin Towers Demolition : तब्बल 9 वर्षांची कायदेशीर लढाई अन् फक्त 9 सेकंदात ट्विन टॉवर्स जमीनदोस्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/25/fc94cb7c92253e7558616bb482192ef91661422775992122_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Uttar Pradesh Noida Twin Towers Demolition : तब्बल 9 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नोएडात (Noida) अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर 28 ऑगस्ट रोजी पाडले जाणार आहेत. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आलं आहे. हे ट्विन टॉवर (Twin Towers) पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत आहे. ही टीम दररोज सुमारे 12 तास स्फोटकं लावण्याचं काम करत आहे. स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे हे दोन टॉवर जमीनदोस्त होतील. विशेष म्हणजे, 32 मजली टॉवर्स पाडल्यानंतर 30 मीटर उंचीपर्यंत याचा ढिगारा तयार होईल. या इमारती पाडल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत याची धूळ पसरेल. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिओ फायबर शीट्स बसवण्यात आल्या आहेत. याशिवाय झाडांच्या सुरक्षेसाठी त्यांना काळ्या पांढऱ्या हिरव्या चादरीनं झाकलं गेलं आहे. जमीनदोस्त होणारी देशातील ही पहिली उंच इमारत असेल.
न्यू ओखला औद्योगिक विकास प्राधिकरण (NOIDA) ने माहिती दिली आहे की, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CBRI) ने सुपरटेकने सादर केलेल्या एमराल्ड कोर्ट आणि ATS ग्रीन व्हिलेज सोसायट्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालास मंजुरी दिली आहे. नोएडा सीईओ रितू माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली 26 ऑगस्ट रोजी झालेल्या सुपरटेक, UPPCB, CBRI, आणि Edifice Engineering या सर्व भागधारकांच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.
बैठकीत, प्राधिकरणानं धूळ आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उचलल्या जाणार्या उपाययोजनांची तपशीलवार माहिती दिली. उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळानं (UPPCB) हवेच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधीच सहा मॅन्युअल एम्बियंट एअर क्वॉलिटी मॉनिटरिंग स्टेशन स्थापित केले आहेत. नोएडा प्राधिकरण तीन AQI मॉनिटरिंग स्टेशन्सवरून हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करेल जे थेट डेटा फीड करतील. अहवालात नमूद करण्यात आल्यानुसार, प्राधिकरण 15 ठिकाणी अँटी स्मॉग गन सज्ज करण्यात येणार असून त्या प्रत्येकाला पाण्याचा टँकर जोडण्यात येणार आहे.
केवळ 9 मिनिटांत जमीनदोस्त होणार देशातील सर्वात उंच इमारत
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोएडामधील सुपरटेकचे ट्विन टॉवर पाडण्याच्या प्रक्रियेत सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ट्विन टॉवर पाडण्याच्या तयारीचा आढावा घेताना ते म्हणाले की, टॉवर पाडण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत या टॉवर्सच्या शेजारी राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात यावी. त्यानंतर लगेचच पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास आयुक्त अरविंद कुमार यांनी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या. 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता अवघ्या 9 सेकंदात ट्विन टॉवर जमिनदोस्त होतील.
पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास आयुक्त अरविंद कुमार यांनी बोलताना सांगितलं की, "28 ऑगस्ट रोजी नियोजित ट्विन टॉवर पाडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. एमराल्ड कोर्टाच्या 660 इमारती आणि एटीएस व्हिलेजच्या 762 इमारती 28 ऑगस्टला रिकाम्या केल्या जातील. ट्विन टॉवर्सच्या आजूबाजूच्या रस्त्यावर वाहतुकीवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेही अर्धा तास बंद राहणार आहे. ट्विन टॉवर जमिनदोस्त झाल्यानंतर सुमारे 80,000 टन मलबा तयार होणार आहे. येत्या तीन महिन्यांत या मलब्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. टॉवरजवळील गेल गॅस पाईपलाईनची सुरक्षा सुनिश्चित केली जात आहे, एमराल्ड कोर्ट आणि एटीएस व्हिलेज सोसायटीच्या वाहनांसाठी पर्यायी पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे.
गेल्या वर्षीच पाडण्यात येणार होता हा ट्विन टॉवर
सर्वोच्च न्यायालयानं 31 ऑगस्ट 2021 रोजी ट्विन टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते, मात्र त्यासाठी कोर्टानं 3 महिन्यांचा अवधी दिला होता. मात्र त्यानंतर तसे होऊ शकले नाही. त्यानंतर त्याची तारीख 22 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली. पण टॉवर पाडण्याची तयारी पूर्ण झाली नाही, त्यामुळे टॉवर पाडण्याचं काम पुढे ढकलण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी टॉवर पाडणाऱ्या कंपनीला आणखी 3 महिन्यांची वाढीव मुदत दिली होती. त्यानंतर 21 ऑगस्ट 2022 रोजी तो पाडायचा होता. मात्र त्यानंतर टॉवर पाडणाऱ्या एडफिस इंजिनिअरिंग कंपनीला एनओसी मिळाली नाही. त्यामुळे आणखी एक आठवडा मुदत वाढवून देण्यात आली. आता 28 ऑगस्टला टॉवर पाडण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)