Ayodhya : वॉर्ड महिलांसाठी आरक्षित होताच नगरसेवक तातडीने बोहल्यावर! लग्नाचं गिफ्ट म्हणून पत्नीला मतदारसंघातून उमेदवारी
Ayodhya Marathi News : राजकारणात एखाद्या नेत्यासाठी खुर्ची ही अत्यंत महत्त्वाची असते. ती मिळवण्यासाठी योग्य वेळी योग्य ती पावले उचलणे अत्यंत आवश्यक असते.
Ayodhya Viral News : सध्या देशात निवडणुकीची (Election 2022) धामधूम सुरू आहे. आज गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये (Gujarat-Himachal) विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच राजकारणात एखाद्या नेत्यासाठी खुर्ची ही अत्यंत महत्त्वाची असते. ती मिळवण्यासाठी योग्य वेळी योग्य ती पावले उचलणे अत्यंत आवश्यक असते. अयोध्येतील (Ayodhya) स्वर्गद्वार वॉर्डमधून नगरसेवक महेंद्र शुक्ला (Mahendra Shukla) यांनी देखील असेच काहीसे केले आहे. महापालिका निवडणुकीच्या आरक्षणाची यादी जाहीर होताच, सोबतच त्यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित होताच शुक्ला यांनी शुभमुहूर्ताचीही पर्वा न करता दुसऱ्याच दिवशी रजिस्ट्रार कार्यालय गाठले आणि चक्क लग्न केले. नेमका प्रकार काय?
पहिल्याच टर्ममध्येच झाले नगरसेवक
अयोध्येतील स्वर्गद्वार येथे राहणारे महेंद्र शुक्ला हे पदवीधर असून त्याच प्रभागातील नगरसेवकही आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी अयोध्या आणि फैजाबाद या दोन्ही नगरपालिका एकत्र करून महानगरपालिका स्थापन करण्यात आली, तेव्हा महेंद्र शुक्ला यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि पहिल्याच टर्ममध्येच ते नगरसेवक झाले. ज्या प्रभागात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दरवर्षी दीपोत्सवासारखा मोठा कार्यक्रम आयोजित करतात, त्याच प्रभागातून त्यांनी विजयाची नोंद केली.
महिला सीट आरक्षित झाल्याचे समजताच केले कोर्ट मॅरेज
समाजवादी पार्टीचे नगरसेवक महेंद्र शुक्ला पुन्हा नगरसेवकपदाच्या निवडणुकीची तयारी करत होते. मात्र, जेव्हा त्यांना 1 डिसेंबर रोजी समजले की, त्यांची जागा महिलांसाठी राखीव झाली आहे. मग काय, त्याच दिवशी त्यांनी लग्नासाठी अर्ज केला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 डिसेंबरला शेजारी राहत असलेल्या प्रिया शुक्लासोबत थेट रजिस्ट्रारच्या कार्यालयात जाऊन रजिस्टर लग्न केले. महेंद्र शुक्ला सांगतात की, त्यांचा साखरपुडा आधीच ठरलेला होता. फेब्रुवारीमध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त होता, मात्र अशा प्रसंगी शुभ मुहूर्ताची वाट कशी पाहायची, आता लग्न ठरले आहे, पत्नी नगरसेवकपदाची निवडणूक लढवणार आहे.
पत्नी लढवणार नगरसेवकपदाची निवडणूक!
महेंद्र शुक्ला म्हणाले की, इतके दिवस मी जनतेची सेवा केली आहे. आता दोघेही मिळून सेवा करू, तसेच लोक त्यांच्या पत्नीला नक्कीच मतदान करतील. या नगरसेवकाची खुर्ची त्यांच्या पत्नीसाठी लग्नाची भेट ठरेल, त्यांच्या विजयामुळे ते लग्नाची मेजवानी देखील देणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Election Results 2022 : गुजरात-हिमाचलमध्ये आज विधानसभेचा निकाल जाहीर होणार, सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात