Lakhimpur Kheri Violence: केंद्रीय राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांचा घटनास्थळी नसल्याचा दावा, म्हणाले..
Lakhimpur Kheri Violence: केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि भाजप नेते अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांनी एफआयआरबाबत एबीपी न्यूजला सांगितले की, यूपीच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास आहे.
Lakhimpur Kheri Violence: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांसह आठ जणांच्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि भाजप नेते अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा संशयाच्या भोवऱ्यात आहे. मात्र, त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. एबीपी न्यूजशी खास बातचीत करताना आशिष मिश्रा यांनी एफआयआरबाबत सांगितले की, यूपीच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि तपासात सत्य समोर येईल.
ते म्हणाले, की "35 वर्षांपासून आमच्या इथं दंगल आयोजित केली जात आहे. जिल्ह्यातील लोकं मोठ्या प्रमाणात तिथं जातात. 3 ऑक्टोबरला दंगल आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना पाचारण करण्यात आले. काही कार्यकर्ते त्यांना आणण्यासाठी गेले होते. एक वाहन आमचे महिंद्रा थार आणि इतर दोन वाहने (एक फॉर्च्युनर आणि छोटी गाडी होती). दरम्यान, जेव्हा आम्ही उपमुख्यमंत्र्यांना घ्यायला जात होतो, तेव्हा काही अराजक घटकांनी आमच्या कारला लाठ्यांनी लक्ष्य केले, काचा फोडल्या.
आशिष मिश्रा म्हणाले, "आमचा एक कार्यकर्ता बाहेर आला आणि पळाला. त्याने आम्हाला संपूर्ण प्रकरण सांगितले. आमच्या चार कार्यकर्त्यांची हत्या झाली. कारला आग लावण्यात आली. मी घटनास्थळी नव्हतो. मी सकाळी 9 वाजल्यापासून दंगलस्थळी होतो, तिथचं कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त होतो."
लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया भागात रविवारी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मूळ गावी भेटीच्या विरोधात झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले. या प्रकरणी मिश्रा यांचा मुलगा आशिषसह अनेक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा एक व्हिडिओ सोमवारपासून व्हायरल होत आहे, ज्यात एक लक्झरी वाहन शेतकऱ्यांना चिरडत जाताना दिसत आहे. यावर खूप तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रियंका गांधींना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेते नजरकैदेत आहेत.