(Source: ECI | ABP NEWS)
Mahakal Temple : उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात वाद, महंत आणि पुजारी एकमेकांना भिडले, महाकालसमोरच शिव्या आणि हाणामारी
Ujjain Mahakal Temple : उज्जैनच्या मंदिरातच महंत आणि पुजाऱ्यामध्ये वाद झाला आणि नंतर त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे.

Ujjain Mahakal Temple : उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरातील (Mahakaleshwar Temple) गर्भगृहात पुजारी आणि महंत यांच्यात मोठा वाद आणि हाणामारी झाल्याचं दिसून आलं. महाकालच्या पुजेची तयारी सुरू असताना महंतांनी वापरलेला पोशाख आणि डोक्यावरील पगडीमुळे हा वाद झाल्याची माहिती आहे. यावेळी महंत आणि पुजाऱ्यांनी एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहिली. घडलेल्या प्रकारामुळे भक्तांमध्ये मात्र गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणाचा लाईव्ह व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ujjain Mahakaleshwar Temple : वादाची पार्श्वभूमी काय?
नाथ संप्रदायातील महंत महावीर नाथ आणि मंदिरातील पुजारी महेश शर्मा यांच्यात गर्भगृहातच शाब्दिक वाद सुरू झाला. त्यानंतर हा वाद एकमेकांना मारण्यापर्यंत गेल्याची चर्चा आहे.
महंतांनी आरोप केला की, पुजार्यांनी महंतांची पगडी उतरवली आणि अभद्र शब्द वापरले. तर पुजाऱ्यांनी सांगितले की, महंतांनी मंदिरातील नियमांनुसार नसलेला पोशाख वापरला आणि नियमभंग केला.
Ujjain Temple Incident : भक्तांमध्ये गोंधळाचं वातावरण
एकीकडे महंत आणि पुजाऱ्यामध्ये वाद सुरू होता, त्यावेळी दर्शनासाठी आलेल्या भक्तांमध्ये मात्र यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. महाकाल मंदिर प्रशासकांनी ही घटना गंभीर स्वरूपाची असल्याची कबुली दिली असून, त्यांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. दोन्ही बाजूंना शांत होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी महंत महावीर नाथ म्हणाले की, "गोरखपूरवरून संत शंकरनाथ यांना घेऊन आम्ही महाकालच्या दर्शनाला गेलो होतो. त्यावेळी गर्भगृहात महेश शर्मा महाकालला जल अर्पण करत होते. महेश शर्मा यांनी शंकरनाथ यांच्या पोशाखावर आक्षेप घेतला आणि अभद्र शब्द वापरले."
तर महेश शर्मा यांनीही त्यांची बाजू मांडली. ते म्हणाले की, "महावीर नाथ हा स्वतःला महंत समजतो आणि त्याने या आधीही मंदिराच्या नियमांचे उल्लंघन केलं आहे. नियमबाह्य पोशाख घालून तो जल अर्पण करत होता. त्यावेळी त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि धक्काही दिला. त्यामुळे मला जखम झाली"
हा वाद धार्मिक स्थळी निर्माण झाल्यामुळे तसेच वादाच्या स्वरूपामुळे त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणात नियम‑मर्यादा, धार्मिक मर्यादा आणि शिस्त यावर प्रश्न उभे राहिले आहेत.
ही बातमी वाचा:
























