CoWIN पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी दिव्यांगासाठी असणारे UDID फोटो ओळखपत्रही चालणार, केंद्र सरकारचा निर्णय
केंद्राने सर्व राज्यांना तशा आशयाचे एक पत्र पाठवलं असून कोरोना लसीकरण केंद्रावरही हे UDID कार्ड ग्राह्य धरण्यात यावं असे निर्देश दिले आहेत.
नवी दिल्ली : दिव्यांग व्यक्तींना आता कोरोना लसीच्या नोंदणीसाठी आधार कार्ड सोबतच त्यांना देण्यात आलेले युनिक डिसॅबिलिटी आयडेन्टिफिकेशन कार्ड अर्थात UDID फोटो ओळखपत्रही चालणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. कोविन 2.0 वर नोंदणी करताना आता UDID कार्डही चालेल आणि राज्यांनी त्यांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये या गोष्टीची नोंद घ्यावी अशा आशयाचं एक पत्र केंद्र सरकारने सर्व राज्यांना पाठवलं आहे. कोविन 2.0 संबंधी 2 मार्च रोजी काही मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये कोविन साठी नाव नोंदणी करण्यासाठी सात प्रकारची ओळखपत्रे चालू शकतील असं सांगण्यात आलं होतं.
केंद्राने राज्यांना लिहिलेल्या या पत्रात सांगण्यात आलं आहे की, केंद्रीय सामाजिक आणि न्याय मंत्रालयाने दिव्यांगांना जी ओळखपत्रं दिली आहेत त्यामध्ये नाव, जन्म दिवस, लिंग, फोटो आणि इतर सर्व गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे दिव्यांगांना कोरोनाची लस देण्यामध्ये अधिक सुलभता यावी यासाठी आता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच दिव्यांगाना कोरोना लस केंद्रावर लस देताना त्यांच्याकडे असलेले हे UDID कार्ड ग्राह्य मानलं जावं असंही केंद्रांने राज्यांना निर्देश दिले आहेत.
कोविन पोर्टलवरील नोंदणीसाठी Captcha वापरला जात होता. पण, आता मात्र Captcha ची गरज नसल्यामुळे लसीकरण प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे. CoWIN पोर्टल आणि अॅवर नोंदणी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान आता लाभार्थ्यांना चार अंकी कोड देण्यात येत आहे. हा कोड त्यांनी निर्धारित लसीकरण केंद्रावर दाखवणं अपेक्षित आहे. अनेक युजर्सनी कॅप्चाला बायपास करत लसीकरणासाठीची वेळ निर्धारित करण्याचा मार्ग शोधल्याचं वृत्त समोर आलं होतं. ज्यानंतर हा चार अंकी कोड इथं जोडण्यात आला. ज्यामुळं नोंदणीमध्ये केल्या जाणाऱ्या चुकीच्या कृत्त्यांवर आळाही बसणार आहे.
CoWIN पोर्टलवर अशा प्रकारे करा लसीकरणासाठीची नोंदणी
- लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम CoWIN अॅप किंवा संकेतस्थळावर भेट द्या.
- ज्यानंतर तिथं Register/Sign in येथे क्लिक करा.
- पुढे मोबाईल नंबर देऊन Get OTP वर क्लिक करा.
- ओटीपी आल्यानंतर तो कॉपी करुन दिलेल्या जागेत पेस्ट करत वेरिफायवर क्लिक करा.
- यानंतर Register for Vaccination हा पेज तुमच्यासमोर सुरु होईल.
- इथं तुम्ही ओळखपत्र माहिती, नाव, लिंग, जन्मतारीख अशी माहिती भरणं अपेक्षित असतं.
- सर्व माहिती भरल्यानंतर Register वर क्लिक करा.
- रजिस्टर केल्यानंतर Appointment schedule हा पर्याय तुम्हाला दिसेल.
- यानंतर Schedule या पर्यायावर क्लिक करा.
- पुढे सर्च बारमध्ये पिनकोड एंटर करा, किंवा जिल्ह्याच्या सहाय्यानं तुम्ही लसीकरण केंद्र शोधा.
- ज्या लसीकरण केंद्रावर लसीसाठीच्या जागा उपलब्ध आहेत त्या दिसताच तुम्हाला हवी ती वेळ निवडून Confirm वर क्लिक करा.
कोविन वर एका मोबाईल क्रमांकावर चार सदस्यांची नोंदणी करता येऊ शकते. इथं तुम्ही लसीकरणासाठी निर्धारित तारीख बदलूही शकता.
महत्वाच्या बातम्या ;