एक्स्प्लोर
उद्धव ठाकरे 18 खासदारांसह अयोध्येत दाखल, काही वेळात रामलल्लांचं दर्शन घेणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोद्धेमध्ये दाखल झाले आहेत. सकाळी 9 च्या सुमारास उद्धव ठाकरे अयोध्येतील फैजाबाद विमानतळावर उतरले.

लखनौ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. सकाळी 9 च्या सुमारास उद्धव ठाकरे अयोध्येतील फैजाबाद विमानतळावर उतरले. उद्धव यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे 18 खासदार कालच (शनिवारी) अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. काही वेळात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सर्व 18 खासदारांसह रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरेंनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अयोध्येचा दौरा केला होता. निवडणुकीनंतर पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करु, असे आश्वासनही त्यांनी त्यावेळी दिले होते. त्याच आश्वासनाची पूर्ती म्हणून आत्ताचा हा अयोध्येचा दौरा असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वी केलेल्या अयोध्या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांनी 'पहले मंदिर, फिर सरकार' असा नारा दिला होता. भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत आले आहे. परंतु मंदिराच्या कामाला सुरुवातदेखील झालेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे आज अयोध्येत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, 2005 मध्ये अयोध्येत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना येत्या 18 जूनला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. यावेळी संभाव्य दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. या कालावधीतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासह तीन व्हीआयपी कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा आज अयोध्या दौऱ्यावर आहेत, तर उपमुख्यमंत्री केशव मौर्या यांच्या उपस्थितीत उद्या धर्म संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असल्यामुळे तसेच धर्म संमेलनांमुळे अयोध्येत सध्या कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अयोध्येत ये-जा करणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी केली जात आहे. हॉटेल, धर्मशाळांवरही पोलिसांची करडी नजर आहे.शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे आणि युवासेनाप्रमुख @AUThackeray यांचे अयोध्या येथे आगमन झाले. #ShivSenaInAyodhya pic.twitter.com/t0Do01lQPe
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) June 16, 2019
आणखी वाचा























