राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून एक कोटींचा निधी, उद्धव ठाकरेंची घोषणा
प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत गेलेल्या उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वावरुन भाजपवर टीकेचा बाण सोडला. भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही, शिवसेना भाजपपासून दूर गेली मात्र हिंदुत्त्वापासून दूर गेलेली नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला.
अयोध्या : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत गेले आहेत. प्रभू रामाचं दर्शन घेण्याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेत सर्वांशी सवांद साधला. यावेळी शिवसेनेकडून राम मंदिराच्या उभारणीसाठी एक कोटी रुपायांचा घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवरही निशाणा साधला.
युती तोडल्यानंतर शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं अशी टीका भाजप नेत्यांकडून सातत्याने होत आहे. या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही. भाजप आणि हिंदुत्व हे वेगळं आहे. शिवसेना भाजपपासून दूर गेलीय मात्र हिंदुत्त्वापासून दूर गेलेली नाही. अयोध्येतल्या राम मंदिर निर्मितीसाठी शिवसेना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार आहे, अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
राममंदिर निर्माणासाठी सरकारने 'श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' नावाची ट्रस्ट स्थापन केली आहे. बाळासाहेब होते तेव्हापासून महाराष्ट्रातून राम मंदिराच्या निर्माणासाठी शिळा पाठवल्या जात आहेत. मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की महाराष्ट्रातून जे रामभक्त प्रभूरामाच्या दर्शनासाठी याठिकाणी येतील, त्यांच्या राहण्याच्या सोईसाठी जमीन द्यावी. आम्ही त्यावर महाराष्ट्र भवन बांधू, अशी असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
यंदा कोरोनाच्या व्हायरसमुळे शरयू नदीवर आरती करु शकत नाही, याचं दुःख आहे. मात्र मी पुन्हा नंतर येईल आणि शरयूची आरती करेन. मी तिसऱ्यांदा अयोध्येत येणं हे माझं सौभाग्य आहे. अयोध्येत आल्यावर बाळासाहेबांची आठवण येते. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी मुख्यमंत्री होईल. मात्र नोव्हेंबरमध्ये अयोध्येला आलो आणि काही दिवसात मुख्यमंत्री झालो. प्रत्येक वेळी रामाचं दर्शन घेतलं की मला काहीतरी चांगलं मिळतं, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
संबंधित बातम्या
काँग्रेस-राष्ट्रवादीनं राम मंदिर निर्माणात हातभार लावावा : संजय राऊत
जुन्या विचाराने गेलो असतो तर राम मंदिर, करतारपुर प्रश्न सुटले नसते; मोदींची काँग्रेसवर टीका
राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवू शकता तर मशिदीसाठी ट्रस्ट का नाही? : शरद पवार