Udaipur Killing : उदयपूर हत्येप्रकरणी भाजपनं दिली राजस्थान बंदची हाक, शहरात कलम 144 लागू
उदयपूरमधील कन्हैया लाल हत्येवरुन राजस्थानमधील वातावरण चांगलच तापलं आहे. याप्रकरणी आज भाजपनं राजस्थान बंदची हाक दिली आहे.
Udaipur Killing : राजस्थानमधील उदयपूर शहरात दिवसाढवळ्या दोन लोकांनी कन्हैया लाल या युवकाचा गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळं ही हत्या करण्यात आली आहे. या संपूर्ण हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. एवढेच नाही, तर आरोपींनी घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेप्रकरणी भाजपनं आज राजस्थान बंदची हाक दिली आहे.
उदयपूरची ही घटना समोर आल्यानंतर राजस्थान सरकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळं आरोपींना अटक केल्यानंतर तातडीनं या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटीमध्ये 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ADG अशोक राठोड, ATS आयजी प्रफुल्ल कुमार आणि एक SP आणि एका अतिरिक्त एसपीचा या तपासात समावेश करण्यात आला आहे.
एनआयए पाकिस्तान कनेक्शनची चौकशी करणार
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएची टीमही या प्रकरणाच्या तपासासाठी राजस्थानला रवाना झाली आहे. एनआयएचे चार सदस्यीय पथक तपास करणार आहे. या घटनेचा इस्लामिक संघटनेशी काही संबंध आहे का? विशेषत: पाकिस्तानचे कनेक्शन आहे की नाही? याची चौकशी करण्यात येमार आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी भाजपनं आज राजस्थान बंदची हाक दिली आहे.
संपूर्ण राजस्थानमध्ये कलम 144 लागू
या घटनेनंतर संपूर्ण उदयपूर शहरात तणावाचे वातावरण आहे. शेकडो लोक आपला निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यानंतर उदयपूरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात कलम-144 लागू करण्यात आले आहे. त्याचबरोबर इंटरनेट सेवाही 24 तास बंद ठेवण्यात आली आहे. एजीडी, आयजी, एसपी परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात येत आहे. उदयपूरमधील संवेदनशील भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. धनमंडी, घंटाघर, हाथीपोल, अंबामाता, सूरजपोल, भूपालपुरा आणि सविना भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या प्रकरणावर राजस्थानच्या लोकांनी संताप व्यक्त केल्यानंतर राज्यभरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.