Kashmir Terrorist : काश्मीरमध्ये गावकऱ्यांनी दोन दहशतवाद्यांना पकडले, डीजीपींकडून दोन लाख रूपयांचे बक्षीस जाहीर
Kashmir Terrorist : काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील तुकसान गावच्या नागरिकांनी दोन दहशतवाद्यांना पकडले आहे. पकडलेल्या दोन्ही दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
Kashmir Terrorist : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांविरोधात मोहीम सूरू आहे. रोज एक-दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येत आहे. तर आज काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील तुकसान गावच्या नागरिकांनी दोन दहशतवाद्यांना पकडले आहे. पकडलेल्या दोन्ही दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होते. दोघेही तुकसान गावात लपले होते. गावकऱ्यांना याबाबत माहिती मिळताच काही लोकांनी एकत्र येत या दोघांना पकडले. दहशतवाद्यांना पकडल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. गावकऱ्यांच्या या शौर्याबद्दल डीजीपींनी त्यांना दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन ऑलआऊट सुरू आहे . ज्या अंतर्गत आतापर्यंत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या कारवाईनंतर सीमेवरील घुसखोरीही जवळपास संपली आहे. मात्र, यापूर्वी टार्गेट किलिंग अंतर्गत झालेल्या हत्यांमुळे सुरक्षा दल सतर्क आहेत. अतिरेकी नागरिकांना लक्ष्य करत आहेत.
निष्पाप नागरिांच्या हत्यांवरून काश्मीरमधील लोकांमध्ये दहशतवाद्यांबद्दल चीड आहे. त्यामुळे आता कोणतीही भीती न बाळगता दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कराची मदत केली जात आहे. लोकांच्या या धाडसाचे पोलीस आणि लष्कराने कौतुक केले आहे. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण खोऱ्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असून, प्रत्येक संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी अनेक निष्पाप नागरिकांच्या हत्या केल्या आहेत. तर लष्कराने देखील अनेक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. कुलगाममध्ये सुरक्षा दलाने गुरूवारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. कुलगाम जिल्ह्यात गुरूवारी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
Operation Sarhad : धक्कादायक! भारतात राहून पाक एजन्सींना पुरवायचे गुप्त माहिती, तिघांच्या मुसक्या आवळल्या
पाकिस्तानच्या तीन वर्षीय मुलाने ओलांडली सीमा, बीएसएफने दिले पाक रेंजर्सच्या ताब्यात