उन्नाव हत्याकांड; एकतर्फी प्रेमातून तीन बहिणींवर विषप्रयोग, दोन आरोपी अटकेत
प्रेमाला नकार दिल्याने संतप्त झालेल्या विनय कुमारने तिच्या हत्येचा कट रचला. त्याला फक्त रागिनीला मारायचे होते. पण काजल व कोमल यांचा मृत्यू झाला. रागिनीवर कानपूर येथे उपचार सुरू आहेत.
उन्नाव : उन्नाव येथे दोन दलित मुलींच्या हत्येनंतर आणि एका मुलीच्या गंभीर स्थिती शुक्रवारी देशातील चर्चेचा विषय ठरला होता. दोन मुलींच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. विनय कुमार उर्फ लांबू असं या आरोपीचं नाव आहे. विनय कुमारसोबत त्याच्या एका अल्पवयीन मित्रालाही अटक करण्यात आली आहे.
गुरुवारी 18 फेब्रुवारी रोजी बाबुराहा गावात दुपारी तीनच्या सुमारास एकाच कुटुंबातील 15, 14 आणि 16 वर्षांच्या तीन मुली जनावरांसाठी चारा घेण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्या तिघी घरी आल्याच नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता, तिघीही गावाबाहेरील शेतात आढळल्या. तिघींनाही एका ओढणीने बांधण्यात आलं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही मुलींपैकी एका मुलीवर विनय कुमार एकतर्फी प्रेम करत होता. त्याचं शेत या मुलींच्या शेता शेजारीज आहे. बर्याच वेळा विनय कुमारने मुलीला (रागिनी) आपला प्रेमाचा प्रस्ताव दिला, पण तिने नकार दिला. प्रेमाला नकार दिल्याने संतप्त झालेल्या विनय कुमारने तिच्या हत्येचा कट रचला. त्याला फक्त रागिनीला मारायचे होते. पण काजल व कोमल यांचा मृत्यू झाला. रागिनीवर कानपूर येथे उपचार सुरू आहेत.
उत्तर प्रदेशात अत्यावस्थ स्थितीत शेतात आढळलेल्या तीन अल्पवयीन मुलींपैकी दोघींचा मृत्यू
रागिनी नेहमीप्रमाणे काजल आणि कोमलसोबत शेतात काम करत होती. गावातील एका अल्पवयीन मित्रासह विनय कुमार तिथे पोहोचला. त्याने पाण्याच्या किटकनाशक मिसळून ते बाटलीत भरुन आणलं होतं. सोबत दुकानातून चिप्सही आणले होते. विनय कुमारने ते चिप्स तिघींनाही दिले. त्यानंतर रागिनीने पाणी मागितलं आणि विनयने तिला विषारी पाण्याची बाटली दिली. रागिणीने पाणी प्यायले आणि बाटली काजलला दिली. काजलनेही पाणी प्यायले आणि बाटली कोमलला दिली. अशा रितीने तिघींनीही विषारी पाणी प्यायले. थोड्याच वेळात तिघीही बेशुद्ध पडल्या. त्यानंतर दोखेही तेथून फरार झाले. या घटनेत कोमल आणि काजल यांचा मृत्यू झाला, तर रागिनीवर कानपूर येथे उपचार सुरू आहेत.