संयुक्त किसान मोर्चाची सिंघू बॉर्डरवर आज बैठक, 26 जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा निघणार?
शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सिंघू बॉर्डरवर बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Farmers Protest : 3 कृषी कायदे केंद्र सरकारने रद्द केले असले तरी अद्याप शेतकऱ्यांच्या काही मागण्या बाकी आहेत. त्या मागण्यावरुन संयुक्त किसान मोर्चा पुन्हा एकदा सरकारला घेरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सिंघू बॉर्डरवर बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे. संयुक्त किसान मोर्चाने केंद्र सरकारला 15 जानेवारीपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. 15 जानेवारीपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा असे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले होते.
कोण असणार या बैठकीला
सिंघू बॉर्डरवर होणाऱ्या आजच्या या बैठकीला विविध शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत शेतकऱ्यांचे आंदोलन पुढे सुरू राहणार का याबाबत देखील चर्चा होणार आहे. केंद्र सरकारच्या विश्वासावर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सिमांवर सुरू असलेले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, अद्याप सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. सुत्रांच्या माहितीनुसार आजच्या बैठकीला दर्शनपाल, बलबीर राजेवाल, राकेश टिकैत, योगेंद्र यादव, गुरनाम चढूनी, शिव कुमार शर्मा, जोगिंदर उग्राहां हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीतच पुढची रणनिती काय ते ठरवले जाणार आहे.
आज होणाऱ्या बैठकीत 26 जानेवारीला काढण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर मोर्चाबाबत देखील चर्चा होणार आहे. कारण, मागील काही दिवसांपूर्वी 26 जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी दिली होती. त्यामुळे त्यावर आज निर्णय घेण्यात येणार आहे. याबरोबरच अन्य काही महत्त्वाचे निर्णय देखील आज होण्याची शक्यता आहे. तसेच निवडणुका लढवणाऱ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांवर कारवाई होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. ही बैठक झाल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाचे नेते पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती सांगणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:























