CM Pramod Sawant Oath : आज प्रमोद सावंत घेणार गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांची उपस्थिती
आज प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ते सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
Goa CM Swearing in Ceremony : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने चांगल यश मिळवलं आहे. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, मणिपूर गोवा आणि उत्तराखंडमध्ये भाजपने सत्ता टिकवण्यात यश मिळवलं आहे. दरम्यान, आज प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ते सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह 9 जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये महिलांना देखील मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या भव्य दिव्य सोहळ्याचे आकर्षण असणार आहे. त्यांच्याबरोबरच 10 भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. गोव्यातील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडिअममध्ये प्रमोद सावंत सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे.
आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशाचे गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर,आसामचे मुख्यमंत्री हेमंत शर्मा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेश पटेल,कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी आणि मणिपूरचे मुख्यमंत्री वीरेंद्र सिंह देखील उपस्थित राहणार आहेत.
हे नेते घेणार मंत्रीपदाची शपथ
1) प्रमोद सावंत
2) विश्वजीत राणे
3) माविन गुदिन्हो
4) अलिक्सो रेजिनाल्ड ( निर्दलीय )
5) गोविंद गावडे
6) रोहन खंवटे
7) सुदिन ढवळीकर (MGPपार्टी)
8) जेनफर मोन्सेरात
9) रवि नाईक
भाजपनं 40 पैकी 20 जागा जिंकल्या
गोव्यामध्ये विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. यामध्ये 20 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तसेच भाजपने गोव्यातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या ( MGP) 2 आमदारांनी आणि तीन अपक्ष आमदारांना पाठिंब्याची पत्रे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना सुपूर्द केली आहेत. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला पुढील सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले होते.
प्रमोद सावंतांचा राजकीय प्रवास
डॉ. प्रमोद सावंत यांची राजकीय कारकीर्द कोल्हापुरातून सुरु झाली. जेव्हा ते तिथे वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्याचवेळी त्यांनी महाविद्यालयाच्या सरचिटणीस (GS) पदाची निवडणूक जिंकून आपले नेतृत्वगुण दाखवून दिले होते. बारावीपर्यंत गोव्यात शिक्षण घेतल्यानंतर सावंत यांनी पुढील शिक्षणासाठी 1991 मध्ये कोल्हापूरच्या रंकाळवेश दुधाळी परिसरात असलेल्या गंगा आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी ते रंकाळा परिसरात भाड्याने राहत होते.
प्रमोद सावंत यांचे नेतृत्वगुण ओळखून त्यांच्या महाविद्यालयातील मित्र परिवाराने त्यांना 1992 मध्ये सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत उभे केले. या निवडणुकीत ते प्रचंड बहुमतांनी जिंकले. यातून खर्या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 1997 मध्ये त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठातून ‘बीएएमएस’ ही पदवी मिळवली. त्यादरम्यान त्यांनी अनेक लोकांशी संपर्क साधला. प्रमोद सावंत हे 2012 मध्ये पहिल्यांदा गोव्यातील साखळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यावेळी त्यांच्या कोल्हापूरच्या 1997 च्या बॅचने सत्कार केला होता. त्यानंतर ते दुसऱ्यांदा विजयी झाले आणि विधानसभेचे अध्यक्ष झाले. पुढे दिवंगत भाजप नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांची पहिल्यांदा 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती.