Taragiri : भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढली! ‘तारागिरी’ युद्धनौका लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्य!
Taragiri : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) येथे रविवारी प्रकल्प 17 ए मधील तिसरी युद्धनौका म्हणजे तारागिरीचे जलावतरण करण्यात आले.
Taragiri : भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढली आहे. कारण भारतीय नौदलाच्या सेवेत तारागिरी युद्धनौकेची एन्ट्री झाली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) येथे रविवारी प्रकल्प 17 ए मधील तिसरी युद्धनौका म्हणजे तारागिरीचे जलावतरण करण्यात आले. 50,000 कोटी रुपयांच्या प्रकल्प 17A कार्यक्रमांतर्गत सात युद्धनौका बांधण्यात येणार आहेत. यातील चार युद्धनौका एमडीएल आणि तीन गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (GRSE) सुधारित स्टिल्थ वैशिष्ट्यांसह बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती माझॅगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) कडून देण्यात आली.
तारागिरी ही युद्धनौका एकात्मिक बांधणी पद्धत वापरून बांधण्यात आली आहे. यामध्ये विविध भौगोलिक ठिकाणी नौकेच्या प्रमुख भागाचे (हुल ब्लॉक्स) बांधकाम आणि एमडीएल येथे एकत्रीकरण/बसवणे यांचा समावेश आहे. तारागिरीची पायाभरणी 10 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आली होती आणि ऑगस्ट 2025 पर्यंत ती नौदलाकडे सुपूर्द होणे अपेक्षित आहे. या युद्धनौकेचे आरेखन भारतीय नौदलाच्या अंतर्गत असलेल्या नौदल डिझाइन ब्युरो या आरेखन संस्थेने केले आहे. युद्धनौका पर्यवेक्षण पथकाच्या (मुंबई) देखरेखीखाली एमडीएल विस्तृत आरेखन आणि बांधणी करत आहे.
युद्धनौकांना डोंगररांगांची नावे
प्रकल्प 17A अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सर्व युद्धनौकांना भारतातील डोंगररांगांची नावे देण्यात आली आहेत. 'तारागिरी' हे नाव उत्तराखंड येथे असलेल्या हिमालयातील गढवाल येथील टेकडीवरून ठेवण्यात आले आहे.
‘तारागिरी’ युद्धनौकेची वैशिष्ट्ये
तारागिरी’ युद्धनौका ही भारीतय नोदलाच्या ताफ्यात आल्यामुळे नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. तारागिरी या युद्धनौकेचे वजन 3510 टन असून तिची रचना भारतीय नौदलाच्या इन-हाउस ब्युरो ऑफ नेव्हल डिझाईनने केली आहे. 149 मीटर लांब आणि 17.8 मीटर रुंद जहाज दोन गॅस टर्बाइन्स आणि दोन मुख्य डिझेल इंजिनच्या संयोजनाद्वारे समर्थित असेल. याचा टॉप स्पीड 28 नॉट्स (सुमारे 52 किमी प्रतितास) असेल. ही नौका ताशी 59 किमी वेगाने समुद्राच्या लाटांना भेदून धावू शकती. या स्वदेशी युद्धनौकेवर 35 अधिकाऱ्यांसह 150 लोक तैनात केले जाऊ शकतात.
तारागिरी ही युद्धनौका एक स्वदेशी बनावटीची असून यामधून अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर्स, प्रगत कृती माहिती प्रणाली, एकात्मिक प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली, जागतिक दर्जाची मॉड्यूलर निवास व्यवस्था, वीज वितरण प्रणाली आणि इतर अनेक प्रगत सुविधा असतील. हे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी सुपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणालीने सुसज्ज आहे.