Mahatma Gandhi : गांधीजींचा नोटांवरील 'हसणारा फोटो' नेमका कधीचा आणि कुठला आहे? तो फोटो कुणी काढला? उत्तर सापडलं...
Currency Notes : भारतीय नोटांवर लक्ष्मी आणि गणेश या देवतांसह अनेक महापुरुषांचा फोटो वापरण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यानंतर गांधीजींचा नोटांवर असलेला फोटो कधीचा आहे हा प्रश्न अनेकांना पडला.
मुंबई: भारतीय नोटांवर आपण नेहमी महात्मा गांधीजींचा (Mahatma Gandhi) हसरा फोटो पाहतो. सर्वच नोटांवर गांधीजींचा एक प्रकारचाच फोटो आहे. पण हा फोटो नेमका कुठला आहे? कुणी काढला आहे? किंवा ते एखादं चित्र आहे का? असे प्रश्न अनेकदा आपल्याला पडतात. अनेकजण म्हणतात की गांधीजींचा हा फोटो कुण्यातरी चित्रकाराने रेखाटला आहे आणि तेच चित्र नंतर नोटांवर छापण्यात आलं. पण ही गोष्ट खरी नाही. खरं सांगायचं तर गांधीजींचा नोटांवरील असलेला फोटो हा 1946 साली कुण्यातरी अज्ञात फोटोग्राफरने काढला आहे. हा फोटो त्या वेळच्या व्हाईसरॉयच्या निवासस्थानासमोरचा, म्हणजे आताच्या राष्ट्रपती भवनच्या (Rasthtrapati Bhavan) समोरचा आहे.
महात्मा गांधी 1946 साली त्यावेळचे भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड व्हेवेल (Lord Wavell) यांच्या भेटीसाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले होते. त्यावेळी गांधीजींच्या सोबत लॉर्ड फ्रेडरिक विल्यम पॅथीक लॉरेन्स (Lord Frederick William Pethick-Lawrence) होते. लॉर्ड फ्रेडरिक विल्यम पॅथीक लॉरेन्स हे ब्रिटनमधील प्रसिद्ध राजकारणी आणि महिलांच्या अधिकारासाठी लढणारे नेते होते. हे दोघे एकत्र असताना हा फोटो घेण्यात आला. हा फोटो व्हाईसरॉयच्या घरासमोर घेण्यात आला होता.
(Source: www.thebetterindia.com)
महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटांची मालिका (Currency Notes) जेव्हा चलनात आणायचं ठरलं त्यावेळी 1946 सालचा हा फोटो वापरण्यात आला. हा फोटो नोटांवर वापरताना क्रॉप करण्यात आला आणि मग तो वापरण्यात आला. हाच फोटो असलेली नोटांची मालिका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियांने 1996 साली चलनात आणली. त्यानंतर सर्वच नोटांवर गांधीजींचा हाच फोटो वापरण्यात आला.
मोदी सरकारच्या काळात गांधीजींच्या फोटोची दिशा बदलली
सुरुवातीच्या नोटांवर गांधीजींचा फोटो हा नोटांच्या उजव्या बाजूला वापरण्यात आला. यामध्ये गांधीजी डाव्या दिशेने पाहताना दिसतात. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदी करण्यात आली. त्यानंतर जवळपास सर्वच नोटांच्या डिझाईनमध्ये आणि रंगामध्ये बदल करण्यात आला.
नव्या नोटांमध्ये महात्मा गांधींचा फोटो हा डाव्या बाजूला दिसतोय. यामध्ये गांधीजी हे उजव्या दिशेले पाहताना दिसतात.
गांधीजींच्या फोटोचा इतिहास
सर्वप्रथम 1969 मध्ये, महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीच्या स्मरणार्थ दोन, पाच, दहा आणि 100 रुपयांच्या नोटांची एक मालिका काढण्यात आली. या नोटांवर वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात बसलेले गांधी चित्रित करण्यात आले होते. ऑक्टोबर 1987 साली 500 रुपयांच्या नोटेवर पहिल्यांदा महात्मा गांधींच्या चित्राची छपाई करण्यात आली. त्यानंतर 1996 साली सर्वच नोटांवर महात्मा गांधींच्या फोटोचा वापर करण्यास सुरुवात झाली.
भारतीय नोटांवर आता महात्मा गांधी यांच्यासोबत लक्ष्मी आणि गणेश या देवतांचा फोटो वापरण्यात यावा अशी मागणी आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांनी केली. त्यानंतर नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांचाही फोटो वापरण्यात यावा अशीही मागणी केली जात आहे. त्याचवेळी नोटेवर असणारा महात्मा गांधींचा फोटो नेमका कुठला आणि कधीचा आहे याचं उत्तर आता मिळालं.