(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fisheries News : देशात 'नील क्रांती' आणण्याच्या अभियानाला मंजूरी, इस्रायलच्या मदतीनं चिलापी माशांच्या उत्पादनासाठी प्रकल्प उभारणार
पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून देशात 'नील क्रांती' आणण्याच्या अभियानाला देखील मंजूरी देण्यात आली आहे.
Fisheries News : मत्स्यपालन (Fisheries ) हा प्राथमिक उत्पादन क्षेत्रांपैकी एक अतिशय वेगाने वाढत असलेले उद्योग क्षेत्र आहे. भारताच्या आर्थिक आणि एकूणच विकासात, या क्षेत्राचे महत्वाचे योगदान आहे. म्हणूनच, ह्या क्षेत्राला, उदयोन्मुख क्षेत्र असं म्हटलं जातं. गरिबांना रोजगार मिळवून देत, समाजात, समान आणि सर्वसमावेशक विकास घडवून आणण्याची क्षमता ह्या क्षेत्रात आहे. सुमारे 14.5 दशलक्ष लोकांना रोजगार देण्याची क्षमता तसेच देशातल्या 28 दशलक्ष मच्छीमारांना उपजीविकेचे शाश्वत साधन देण्याचे सामर्थ्य असलेला हा व्यवसाय आहे. म्हणूनच, या क्षेत्रात अधिकाधिक उद्यमशील युवकांनी यावं असं आवाहन केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे. तसेच पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेच्या (Prime Minister Matsya Sampada Yojana) माध्यमातून देशात 'नील क्रांती' आणण्याच्या अभियानाला देखील मंजूरी देण्यात आली आहे.
इस्रायलच्या मदतीनं चिलापी माशांचे उत्पादनासाठी अत्याधुनिक प्रकल्प उभारणार
दरम्यान, मत्स्यपालन क्षेत्रातल्या समस्यांवर उपाययोजना सुचवाव्यात, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या आव्हानांवर मात करावी, असे आवाहन करण्यात आलं आहे. या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील, मंत्रिमंडळाच्या बैठकीत, 'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजन' च्या माध्यमातून, मत्स्यपालन क्षेत्राच्या शाश्वत आणि सुनियोजित विकासाद्वारे, देशात 'नील क्रांती' आणण्याच्या अभियानाला मंजूरी देण्यात आली आहे.
मत्स्यपालन क्षेत्राची क्षमता लक्षात घेऊन, केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितीतील संस्था तंत्रज्ञान विकास महामंडळाने, महाराष्ट्रातील नवी मुंबईतली खासगी संस्था, मेसर्स फाऊंटनहेड, अॅग्रो फार्म प्रायव्हेट लिमिटेडला पाठबळ दिले आहे. ही संस्था, इस्रायलच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, नर जातीच्या तिलापिया म्हणजेच चिलापी माशांचे उत्पादन करण्यासाठी अत्याधुनिक प्रकल्प उभारणार आहे. यासाठी मंडळाने, एक सामंजस्य करार केला आहे. त्याद्वारे एकूण प्रकल्प खर्चाच्या म्हणजेच 29.78 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी, 8.42 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा केला जाणार आहे.
चिलापी हा जगातला सर्वाधिक उत्पादनक्षम आणि व्यापार होणारा मासा
तिलापिया म्हणजेच 'चिलापी' हा जगातला सर्वाधिक उत्पादनक्षम आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक व्यापार होणारा मासा म्हणून ओळखला जातो. जगाच्या अनेक भागात, चिलापीचा वापर व्यावसायिकदृष्ट्या अतिशय लोकप्रिय ठरला असून, मत्स्यव्यवसाय क्षेत्रातले तज्ञ, त्याला, 'सागरातील चिकन' म्हणून ओळखतात. कारण त्याचे जलद उत्पादन आणि अगदी कमी खर्चात होणारी पैदास आहे. या माशांच्या उत्पादनाला व्यावसायिक सुनियोजित पद्धतीने चालना देण्याच्या दृष्टीने, मेसर्स फाऊंटनहेड फार्मस् प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने या माशांच्या पैदासीसाठी, एक वेगळी उत्पादन व्यवस्था, कर्नाटकच्या मुधोळ इथे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
तंत्रज्ञानाद्वारे, बांध घातलेल्या कोरडवाहू शेतजमिनीवरी मत्स्यपालन होणार
दरम्यान, इस्रायलच्या मत्स्यपालन उत्पादन तंत्रज्ञान लिमिटेड (APTIL) अत्याधुनिक इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. ( ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या तंत्रज्ञान सेवा कराराअंतर्गत) या तंत्रज्ञानाद्वारे, बांध घातलेल्या कोरडवाहू शेतजमिनीवर, नदीतून मिळणाऱ्या गोड्या पाण्यात ही मत्स्यशेती केली जाणार आहे. कृत्रिम तलावासारख्या क्षेत्रात भारतात कुठेही ही मत्स्यशेती होऊ शकेल. भारतातील तापमानात, हवामानात हे मत्स्यपालन यशस्वी व्हावे, यासाठी त्या प्रकल्पाला, अनुकूल ठरतील अशा सुविधाही देण्यात येणार आहेत. जसे की भूमीची उपलब्धता, पाण्याची उपलब्धता, अनुकूल हवामान, आजूबाजूला आवश्यक ती संसाधने, मातीची योग्य परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती याचाही विचार केला जाणार आहे.
मच्छिमार समुदायाला आर्थिकदृष्ट्या समक्ष करण्यासाठी विशेष प्रयत्न
केंद्र सरकारने 'नील क्रांती' च्या माध्यमातून, देशातील मच्छिमार समुदायाला आर्थिकदृष्ट्या समक्ष करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. निर्यातीची प्रचंड क्षमता असलेल्या या क्षेत्रात, विशेषत: चिलापी माशाच्या व्यापारासाठी असलेल्या जागतिक संधी बघता, या क्षेत्रात विकासाला मोठा वाव आहे. तसेच, यासाठी वापरण्यात येणारी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली, “प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना या पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मोठे पाठबळ देणारी ठरेल. मासेमारी क्षेत्रातील उत्पन्न दुपटीने वाढवत, 1,00,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
महत्त्वाच्या बातम्या: