एक्स्प्लोर
Advertisement
नोटाबंदीच्या काळात बँकेत पैसे भरणाऱ्यांची सरसकट चौकशी होणार नाही: CBDT
नवी दिल्ली: नोटाबंदीनंतर ज्या प्रामाणिक नागरिकांनी बँक खात्यात रू. 2.5 लाख रूपये जमा केले आहेत, त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही, त्यांची कसलीही चौकशी होणार नाही, असं सीबीडीटी म्हणजेच प्रत्यक्ष कर केंद्रीय मंडळाच्या प्रमुखांनी स्पष्ट केलं आहे. इन्कम टॅक्स किंवा प्राप्तिकर विभाग हा या सीबीडीटी अंतर्गत येतो.
नोटाबंदीनंतर बँक खात्यात मोठ्या रकमा जमा करणाऱ्यांची सध्या चौकशी सुरू आहे. अशा तब्बल 18 लाख लोकांना ईमेल आणि एसएमएसच्या माध्यमातून नोटिसा पाठवण्यात आल्याचंही यापूर्वी केंद्रीय महसूल सचिव हसमुख आधिया यांनी सांगितलं होतं.
सीबीडीटीचे प्रमुख सुशील चंद्र यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की प्रामाणिक करदात्यांना प्राप्तिकर विभागाकडून कसलाही त्रास होणार नाही. नोटाबंदीनंतर या नागरिकांनी बँकात जमा केलेल्या मोठ्या रकमा त्यांच्या मागील वर्षीच्या कर परताव्याशी सुसंगत असतील तर त्यांना घाबरण्याचं काहीच कारण नाही.
देशभरातील बँकाकडून सध्या प्राप्तिकर विभागाकडे नोटाबंदीदरम्यान जमा झालेल्या मोठ्या रकमांचा तपशील येत आहे. अशा तब्बल 18 लाख खातेदारांनी जमा केलेल्या रकमांची छानणी सुरू आहे. त्यामध्ये रू. 2 लाखांपासून 80 लाखांपर्यंत बँक खात्यात जमा करणारे नागरिक आहेत.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बँक खात्यात रू. 2.5 लाख रूपये जमा करणाऱ्या खातेदारांची सध्या कोणतीही चौकशी होणार नाही.
बिग डेटा अॅनालिटिक्स या प्राप्तिकर विभागाने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नोटाबंदीच्या काळात बँकात जमा झालेल्या रकमेचं विश्लेषण सध्या सुरू आहे. मात्र पहिल्या टप्प्यात रू. 2.5 लाख जमा करणाऱ्या खातेदारांची चौकशी होणार नाही. त्यांनी जमा केलेल्या रकमा त्यांच्या प्राप्तिकर विवरणाशी सुसंगत असल्याची पडताळणी मात्र केली जाणार आहे.
बिग डेटा अॅनालिटिक्सच्या सहाय्याने रू. 2 लाख ते 80 लाखांदरम्यान रोकड बँक खात्यात जमा करणाऱ्यांची माहिती वेगळी काढण्यात आल्याचंही सीबीडीटीचे अध्यक्ष सुशील चंद्र यांनी सांगितलं.
सीबीडीटी चेअरमन सुशील चंद्र यांनी उदारहरण देताना असं सांगितलं की समजा एखाद्या खातेदाराने नोटाबंदीदरम्यान बँकेत तीन लाख रूपये जमा केले आणि इनकम टॅक्स रिटर्न नुसार त्याचं करपात्र उत्पन्न दहा लाख असेल तर त्याला कसलाही त्रास होणार नाही. कारण बँकेत त्याने जमा केलेली रक्कम त्याच्या रिटर्नशी सुसंगत आहे. त्याचवेळी समजा तुम्ही बँक खात्यात जर पाच लाख रूपये जमा केले आहेत आणि तुम्ही गेल्या तीन वर्षांपासून टॅक्स रिटर्न फाईल केलेला नसेल तर तुम्हाला चौकशीला सामोरं जावं लागेल. तसंच जर तुम्ही बँकेत नोटाबंदीच्या काळात रू. दहा लाख जमा केले आणि प्राप्तिकर विवरणानुसार तुमचं उत्पन्न फक्त अडीच लाख आहे तर तुम्हाला चौकशीला सामोरं जावं लागेल.
प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना एका छाप्यादरम्यान समजलेली माहितीही त्यांनी सांगितली. एका शैक्षणिक संस्थाचालकाने आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यात दोन दोन लाखाची रक्कम जमा केली. त्यापैकी एका कर्मचाऱ्याने आमच्याकडे तक्रार केली. त्यानंतर आम्ही त्या संस्थाचालकाच्या कार्यालय आणि घरावर छापे टाकले तर त्याने आमच्याकडे दहा कोटींची रोकड सुपूर्द केली.
नोटाबंदीच्या काळात रू. 2.5 लाखांच्या मर्यादेचाही मोठा गैरवापर झाल्याचं दिसून आलं आहे. त्याचीही माहिती प्राप्तिकर विभाग घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र या कारवाईत प्रामाणिक करदात्यांना कसलाही त्रास होणार नाही, याचीही दक्षता घेत असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं.
नोटाबंदीच्या काळात मोठी रोकड जमा करणाऱ्या खातेदारांना ईमेल आणि एसएमएसद्वारे पाठवण्यात आलेल्या नोटीसा या अंतिम नाहीत, त्यानंतरही त्या खातेदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी एक संधी देण्यात येणार असल्याचं सुशील चंद्र यांनी स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement