Nupur Sharma: नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी मागा!
Nupur Sharma : भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने कठोर शब्दात फटकारले आहे. प्रेषित पैगंबर यांच्याबाबत नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याने देशातील वातावरण बिघडले असल्याचे कोर्टाने म्हटले.
![Nupur Sharma: नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी मागा! supreme court slams nupur sharma and says he should apologise on comment prophet paigambar Nupur Sharma: नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी मागा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/01/fe67946a3364cabf08eae107192334ff_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nupur Sharma : भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशातील वातावरण तणावाचे झाले होते. काही ठिकाणी हिंसाचारही झाला. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या वक्तव्यावरून नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे. तुमच्या वक्तव्याने देशातील वातावरण बिघडले आणि माफी मागण्यासाठी तुम्ही उशीर केला असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. सुनावणीत सुप्रीम कोर्टाने दिल्ली पोलिसांनाही फटकारले.
आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना म्हटले की, तुम्ही स्वत: वकील असल्याचे सांगता. मात्र, तरीदेखील तुम्ही बेजबाबदारपणाचे वक्तव्य केले आहे. सत्तेची हवा डोक्यात शिरता कामा नये असेही खडे बोल सुप्रीम कोर्टाने सुनावले. सुप्रीम कोर्टाने संबंधित वृत्तवाहिनीलादेखील सुनावले. या वृत्तवाहिनीच्या चर्चा कार्यक्रमात नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदकाने भडकवण्याचे काम केले तर त्यांच्या विरोधात गु्न्हा दाखल का करू नये असेही कोर्टाने विचारले.
सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना खडे बोल सुनावताना म्हटले की, तुमच्यामुळे देशातील वातावरण खराब झाले आहे. तुम्ही माफीदेखील उशिरा मागतिली. ही माफीदेखील अटींसह असल्याचे कोर्टाने म्हटले. कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारताना म्हटले की, नुपूर शर्मा यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांमध्ये पहिल्यांदा एफआयआर नोंदवण्यात आला. मग, त्याविरोधात तुम्ही कारवाई का केली नाही, असा सवाल कोर्टाने केला.
या सुनावणी दरम्यान, नुपूर शर्मा यांचे वकील अॅड. मनिंदर सिंह यांनी सांगितले की, टीव्हीवर काही पॅनलिस्ट वारंवारपणे शिवलिंगाबाबत अपमानास्पद वक्तव्ये करत होते. नुपूर शर्मा यांचा कोणत्याही धर्माचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. कोर्टाची ही भूमिका असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असेल असे सिंह यांनी म्हटले. तर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत काही जबाबदारीदेखील असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. एकच एफआयआर योग्य ठरवायचे असल्यास हायकोर्टात दाद मागा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. दिल्लीतील एफआयआरचे काय झाले, असा प्रश्न करताना दिल्ली पोलिसांनी तुमच्यासाठी रेड कार्पेट अंथरले असावे, असे कोर्टाने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)