Supreme Court Collegium: सर्वोच्च न्यायालयाला आणखी 3 नवे न्यायाधीश मिळणार, 'या' हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींची कॉलेजियमने केली शिफारस
Supreme Court Collegium: सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दिल्ली, राजस्थान आणि गुवाहाटी उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींना सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती देण्याची शिफारस केली आहे.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) कॉलेजियमने सोमवार (6 नोव्हेंबर) रोजी उच्च न्यायालयाच्या तीन मुख्य न्यायमूर्तींना (Justice) सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती देण्याची शिफारस केली. यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा, राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ऑगस्टिन जॉर्ज मसिह आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संदीप मेहता यांच्या नावांचा समावेश आहे.
#BREAKING
— Live Law (@LiveLawIndia) November 6, 2023
Supreme Court Collegium recommends elevation of three High Court Chief Justices to the Supreme Court :
Chief Justice of Delhi HC Satish Chandra Sharma
Chief Justice of Rajasthan HC Augustine George Masih
Chief Justice of Guwahati HC Sandeep Mehta
सर्वोच्च न्यायालयात किती पदे रिक्त ?
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण मंजूर पदे 34 आहेत. त्यामधील 3 पदे रिक्त आहेत. हीच तीन पदं भरण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम न्यायमूर्तींच्या नावांची शिफारस करण्यात आलीये. या कॉलेजियममध्ये सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा समावेश आहे.
कोण आहेत सतीश चंद्र शर्मा?
सतीश चंद्र शर्मा यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1961 रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे झाला. वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी शर्मा मध्य प्रदेश उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून ते कार्यरत झाले.त्यानंतर शर्मा यांना 18 जानेवारी 2008 रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. दोन वर्षांनंतर, म्हणजे 2010 मध्ये, त्यांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. सध्या ते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत.
ऑगस्टीन जॉर्ज मसीह कोण आहेत?
ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांचा जन्म 12 मार्च 1963 रोजी झाला. 10 जुलै 2008 रोजी मसिह यांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर 14 जानेवारी 2011 रोजी त्यांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. मसीह 20 मे 2023 पासून राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदावर कार्यरत आहेत.
संदीप मेहता यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश केव्हा बनवण्यात आले?
संदीप मेहता यांना 30 मे 2011 रोजी राजस्थान उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर यंदाच्या वर्षात म्हणजे 6 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. मेहता हे 15 फेब्रुवारी 2023 पासून गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत.