हरिश साळवे म्हणाले 'CJI मित्र आहेत म्हणून...', सरन्यायाधीशांच्या निवृत्तीचा शेवटचा दिवस अन् साळवेंची अॅमिकस क्युरीवरुन माघार!
सुप्रीम कोर्टाने कोविड नियोजनाच्या मुद्द्यांवर ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांना ॲमिकस क्युरी म्हणजे न्यायालयाचा मित्र म्हणून नियुक्त केलं होतं. मात्र आज हरीश साळवे यांनी आपल्याला या पदावरुन दूर व्हायचं असल्याचं सांगितलं.
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने कोविड नियोजनाच्या मुद्द्यांवर ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांना ॲमिकस क्युरी म्हणजे न्यायालयाचा मित्र म्हणून नियुक्त केलं होतं. मात्र आज हरीश साळवे यांनी आपल्याला या पदावरुन दूर व्हायचं असल्याचं सांगितलं. हा खूप संवेदनशील मुद्दा असून मला या प्रकरणात सरन्यायाधीशांचा कॉलेज जीवनापासूनचा मित्र आहे म्हणून अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्त केलं असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं मला या पदावरुन मुक्त करा, असं साळवेंनी म्हटलं.
सरन्यायाधीश बोबडे आज निवृत्त होत आहेत. आज त्यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी या प्रकरणावर सुनावणी झाली. हरीश साळवेंच्या दाव्यावर सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, आम्हालाही हे जाणून वाईट वाटलं कि, कोविड संदर्भात प्रकरणात साळवे यांना न्याय मित्र नियुक्त करण्यावरुन काही वकील काहीबाही बोलत आहेत. यानंतर कोर्टानं हरीश साळवे यांना कोविड-19 वर राष्ट्रीय योजनेशी संबंधित प्रकरणावरुन न्याय मित्र पदावरुन हटण्यास मंजूरी दिली. आता सुप्रिम कोर्टानं साळवे यांच्या जागी अनुराधा दत्त यांना अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्त केलं आहे. तसेच सॉलिसीटर यांनी म्हटलं की, चांगलं झालं असतं जर लोकांनी प्रेमानं CJI यांना निरोप दिला असता मात्र लोकांच्या मनात कटुता भरलेली आहे.
काय आहे प्रकरण
देशभरात कोरोनाचे वाढते रुग्ण आणि गंभीर होत चाललेली परिस्थिती पाहता सुप्रीम कोर्टानं गुरुवारी म्हटलं होतं की, केंद्र सरकार रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि अन्य आवश्यक औषधांचं योग्य वितरण करण्यासाठी एक 'राष्ट्रीय योजना' घेऊन आलं. सोबतच या प्रकरणात ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची न्याय मित्र म्हणून नियुक्ती केली होती. न्यायालयानं म्हटलं होतं की, आम्ही चार मुद्दे ऑक्सिजन पुरवठा, आवश्यक औषधांचा पुरवठा, लसीकरणाची पद्धत आणि लॉकडाऊन घोषित करण्याबाबत जाणून घेऊ इच्छितो.