(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षाचं काय होणार? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करुन सर्व विद्यापीठांना 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा आयोजित करण्यास सांगितलं होतं. यूजीसीच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
नवी दिल्ली : विद्यापीठांच्या अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याच्या यूजीसीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने यूजीसीला शुक्रवार (31 जुलै) उत्तर देण्यास सांगितलं होतं. कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांची आरोग्याचा विचार करुन सध्या परीक्षा आयोजित करु नये अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे.
यूजीसीने 6 जुलै रोजी मार्गदर्शक सूचना जारी करुन सर्व विद्यापीठांना 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाची परीक्षा आयोजित करण्यास सांगितलं होतं. यूजीसीच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. विविध विद्यापीठातील 31 विद्यार्थी, कायद्याचा विद्यार्थी यश दुबे, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आणि विद्यार्थी कृष्णा वाघमारे या सगळ्यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकांमध्ये देशभरात सुरु असलेल्या कोरोना महामारीचा हवाला देऊन ही परीक्षा पुढे ढकलण्याची किंवा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जस्टिस अशोक भूषण, सुभाष रेड्डी आणि एम आर शाह यांच्या खंडापीठासमोर या याचिकांवर सुनावणी होणार आहे. यूजीसीच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं की, देशाच्या 818 पैकी 209 विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेचं आयोजन केलं आहे. 394 विद्यापीठ परीक्षांचं आयोजन करणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षांचा पर्याय दिला जाऊ शकतो. त्यांच्या आरोग्याला कोणताही धोका होणार नाही.
दुसरीकडे 31 विद्यार्थ्यांच्या वतीने वकील अलख आलोक श्रीवास्तव, कायद्याचा विद्यार्थी यश दुबेच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि युवासेनातर्फे ज्येष्ठ वकील श्याम दीवाण सुप्रीम कोर्टात बाजू मांडत आहे. यूजीसीच्या या पर्यायावर वकिलांनी असहमती दर्शवली आहे. देशात सातत्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, अशा परिस्थिती परीक्षांच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतं. या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी करुन निर्णय घेतला जाईल, असं न्यायमूर्तींनी वकिलांना सांगितलं.
सुप्रीम कोर्टाने यूजीसीला बुधवारपर्यंत (29 जुलै) लेखी उत्तर दाखल करण्यास सांगितलं होतं. शिवाय याचिकाकर्त्यांना वाटलं तर गुरुवारपर्यंत (30 जुलै) यूसीजीच्या प्रतीज्ञापत्रावर आपल्याकडून उत्तर देऊ शकतात, असंही कोर्टाने म्हटलं होतं. आज म्हणजेच 31 जुलै रोजी यावर सुनावणी होणार आहे.
संबंधित बातम्या
- यूजीसीच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात युवासेनेच्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत एकसमान सूत्र ठरवून पदवी प्रदान करावी, मंत्री उदय सामंत यांचं केंद्राला पत्र
- 'अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणं', राज्य सरकारचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
- परीक्षा घेण्यावरुन राष्ट्रीय पातळीवरही विरोध, राहुल गांधीपाठोपाठ अरविंद केजरीवालही आक्रमक, मोदींना पत्र