Sonia Gandhi Hospitalised : मोठी बातमी! काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
Sonia Gandhi Hospitalised : काँग्रेस नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Sonia Gandhi Hospitalised : काँग्रेस (Congress) नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना दिल्लीतील (Delhi) सर गंगाराम रुग्णालयात (Sir Ganga Ram Hospital) दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. रुग्णालय प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. सोनिया गांधी यांना गुरुवारी (2 मार्च) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर डॉ. अरुप बासू (Dr. Arup Basu) आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली आहेत. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
मीडिया रिपोर्टनुसार, सर गंगाराम रुग्णालय प्रशासनाने माहिती देत सांगितलं आहे की, "काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या विविध चाचण्या सुरु आहेत." त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितलं आहे. सोनिया गांधी यांना ताप आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी शुक्रवारी (3 मार्च) दिली आहे.
सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरु
सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्या सध्या 76 वर्षांच्या आहेत. त्यांना गुरुवारी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. चेस्ट मेडिसिन विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. अरुप बसू यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची टीम त्याच्यावर उपचार करत आहे.
जानेवारी महिन्यामध्येही त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एक आठवडाभर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. यावेळी भारत जोडो यात्रा सोडून राहुल गांधीही दिल्लीत दाखल झाले होते.
कोरोनामुळेही बिघडली होती प्रकृती
याआधी गेल्या वर्षी म्हणजे 2022 च्या जून महिन्यामध्ये सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली होती. तेव्हा त्यांना कोरोनावरील उपचारासाठी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोना विषाणू (COVID-19) संसर्गाचा त्रास होत असल्याने तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.