सोनिया गांधींनी बोलवली असंतुष्ट कॉंग्रेस नेत्यांची बैठक, पक्ष बळकट करण्यावर देणार भर
कॉंग्रेस पक्षात नेतृत्व आणि व्यापक संघटनात्मक बदल व्हावा यासाठी पत्र लिहलेल्या 23 नेत्यांशी सोनिया गांधी शनिवारी चर्चा करणार आहेत.
नवी दिल्ली: बिहार निवडणुकीच्या मानहानीकारक पराभवानंतर कॉंग्रेस पक्षात नेतृत्व आणि व्यापक संघटनात्मक बदल व्हावा यासाठी कॉंग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहलं होतं. आता त्या नेत्यांशी सोनिया गांधी स्वत: चर्चा करणार असल्याचं समजतय. या नेत्यांची शनिवारी दिल्लीत सोनिया गांधींच्या 10 जनपथ या निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली आहे. या नेत्यांची सोनिया गांधींच्या सोबत बैठक आयोजित करण्यात कमलनाथ यांनी पुढाकार घेतल्याचं वृत्त आहे.
या बैठकीत कॉंग्रेस पक्षाला बळकट करणे आणि नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणे या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक पुढच्या वर्षी जानेवारीच्या शेवटी होणार आहे.
या बैठकीत डॉ मनमोहन सिंह, एके अॅन्टनी, पी चिदंबरम, गुलाम नबी आझाद, आंनद शर्मा, शशी थरूर, भूपिंदर सिंह हुड्डा, केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, हरीश रावत यांच्या सोबत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील भाग घेणार आहेत. कमलनाथांनी या बैठकीच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली असून तेही या बैठकीत भाग घेणार आहेत असं वृत्त आहे.
यासंदर्भात कमलनाथांनी काही दिवसापूर्वी सोनिया गांधींची भेट घेतली होती. पत्र लिहणाऱ्या एका कॉंग्रेसच्या नेत्याने सोनिया गांधींनी त्यांना चर्चेसाठी बोलावलं असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सूत्रांनी असंही सांगितलं की दीर्घ काळापासून कॉंग्रेसच्या धोरणांवर नाराज असलेल्या नेत्यांचीही सोनिया गांधी भेट घेणार आहेत. सोनिया गांधींनी बोलावलेल्या या बैठकीनंतर असंतुष्ट नेते परत पक्षात सक्रिय होतील अशी चिन्हं आहेत.
ऑगस्ट महिन्यात गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल यांच्या सहित कॉंग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाला सक्रिय अध्यक्षाची गरज आणि व्यापक संघटनात्मक बदल करावा अशी मागणी केली होती. यावर काही कॉंगेस नेत्यांनी गांधी परिवाराच्या वर्चस्वाला आव्हान दिलं गेलं असल्याचं मत व्यक्त केलं होतं. अनेकांनी गुलाम नबी आझाद यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली होती.
महत्वाच्या बातम्या: