Smriti Irani Visit Medina : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला मदिना शहराचा दौरा; कट्टरतावादी संतप्त
Smriti Irani Visit Medina : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भारतीय शिष्टमंडळासह मदीना शहराला भेट दिली.
Smriti Irani Visit Medina : भारताच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी इस्लाम धर्माच्या पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या मदीना (Medina) शहराला ऐतिहासिक भेट दिली आहे. सौदी अरेबियाने त्याच्या भेटीला परवानगी दिल्याबद्दल मुस्लिम कट्टरतावाद्यांनी टीका केली आहे. सौदी अरेबियाने गैर-मुस्लिम महिलेला मदीना येथे जाण्याची परवानगी देऊ नये, असे कट्टरवाद्यांनी म्हटले आहे. याबाबत सोशल मीडियावर सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान अल सौद यांच्या विरोधात मोहीम चालवली जात आहे. स्मृती इराणी या भारताच्या महिला आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आहेत. भारतीय शिष्टमंडळासह त्या मदीना येथे दाखल झाल्या.
केंद्रीय महिला आणि बालविकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी आणि परराष्ट्र आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री एसव्ही मुरलीधरन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी मदीना शहराला भेट दिली. दोनच दिवसांपूर्वी भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. यामध्ये यावर्षीच्या नियोजित हज यात्रेसाठी 1,75, 025 यात्रेकरूंचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्याला द्विपक्षीय हज करार 2024 असे नाव देण्यात आले आहे. सौदीचे हज आणि उमराह मंत्री तौफिक बिन फौजान अल-रबिया यांनी जेद्दाह येथे या करारावर स्वाक्षरी केली.
भारतीय शिष्टमंडळाने कुठे भेटी दिल्या?
वृत्तानुसार, भारतीय शिष्टमंडळाने मदीना च्या मरकझिया भागात असलेल्या पैगंबर मशिदीच्या (अल मस्जिद अल नबावी) परिघाला भेट देणे सुरू केले. त्यानंतर, शिष्टमंडळाने उहुद पर्वत आणि कुबा मशिदीसह ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. विशेषतः इस्लामची पहिली मशीद म्हणून कुबा मशिदीला महत्त्व आहे. मदीना हे इस्लाम धर्मीयांसाठी दुसरे सर्वात पवित्र शहर समजले जाते. प्रेषित मुहम्मद यांनी मक्का सोडल्यानंतर (इ.स.622) त्यानी मुस्लिम समुदायाची (उम्मा) स्थापना केली होती. याच ठिकाणी त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले आहे.
स्मृती इराणींनी केले ट्वीट
स्मृती इराणी यांनी आपल्या मदीना भेटीची माहिती ट्विटरवर शेअर केली आहे. "इस्लामच्या पवित्र शहरांपैकी एक असलेल्या मदीनाला आजच्या ऐतिहासिक भेटीमध्ये पैगंबर मशीद अल-मशीद अल-नबावी, उहुदचे पर्वत आणि कुबा मशिदीच्या परिमितीचा समावेश आहे - इस्लामची पहिली मशीद," आदी ट्वीट इराणी यांनी केले.
Undertook a historic journey to Madinah today, one of Islam's holiest cities included a visit to the periphery of the revered Prophet's Mosque, Al Masjid Al Nabwi, the mountain of Uhud, and periphery of the Quba Mosque – the first Mosque of Islam. The significance of the visit to… pic.twitter.com/WgbUJeJTLv
— Smriti Z Irani (@smritiirani) January 8, 2024
मदीनामधील काही ठिकाणी मुस्लिमेत्तर नागरिकांना प्रवेश करण्यास बंदी आहे. त्यामुळे स्मृती इराणी यांनी मदीनातील काही ठिकाणी भेट दिल्याने कट्टरतावाद्यांनी संताप व्यक्त केला आहे.