(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sitrang Cyclone : ऐन दिवाळीत बंगालच्या उपसागरात 'सीतरंग' चक्रीवादळाची शक्यता, तर पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
ऐन दिवाळीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. येणारं वादळ हे 'सीतरंग' या नावानं (Sitrang Cyclone) ओळखलं जाणार आहे.
Sitrang Cyclone : ऐन दिवाळीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. येणारं वादळ हे 'सीतरंग' या नावानं (Sitrang Cyclone) ओळखलं जाणार आहे. 20 ते 21 ऑक्टोबरच्या दरम्यान हे चक्रीवादळ निर्माण होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पण त्या वादळाचं मार्गक्रमण कसं राहिलं अद्याप निश्चित सांगता येणार नाही. मात्र, येत्या 23 आणि 24 ऑक्टोबरच्या सुमाराला पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
सध्या महाराष्ट्रात परतीचा पाऊस कोसळत आहे. दिवाळीत देखील पावसाचा जोर असण्याचा अंदाज हवामान विभागानं सांगितला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आाहन देखील हवामान विभागानं केलं आहे. सध्या एकीकडं राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच शेती पिकांना देखील याचा मोठा फटका बसला आहे. उत्री पिकं पाण्यात असल्यानं हाती काहीच उत्तन्न येण्याची शक्यता नाही. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच पुन्हा हवामान विभागान 23 आणि 24 ऑक्टोबरला राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
चक्रीवादळांना नावं देण्यास कशी सुरुवात झाली
पूर्वी चक्रीवादळांना नावं दिली जात नव्हती. वादळांच्या तारखांवरुनच ती लक्षात ठेवली जात होती, पण यामध्ये अनेक अडचणी जाणवू लागल्या. त्यातच समुद्रात एकाच वेळी दोन किंवा त्याहून अधिक भागांत चक्रिवादळसदृश परिस्थिती उदभवण्याची शक्यताही नाकारली गेली नाही. अशा परिस्थितीत तारखांचं गणित काहीसं कठिणच होत गेलं. ज्यानंतर जागतिक स्तरावर वैज्ञानिकांनी चक्रीवादळांना नावं देण्याचं ठरवल्याची माहिती हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी एबीपी माझाला दिली.
चक्रीवादळाच्या नावांवरुन बरेच विचार झाले, ज्यानंतर बाहेरील देशांमध्ये वादळांना महिलांची नावं देण्यात आली. पण, वादळाचा थेट संदर्भ हा विध्वंसाशी लावला जात असून, यामध्ये नकारात्मकताच जास्त येते म्हणून यावर आक्षेप घेतला गेला आणि मग चक्रीवादळांना दुसऱ्या नावानं संबोधण्यास सुरुवात झाली. चक्रीवादळाच्या नावांसाठी दक्षिण आशियायी राष्ट्रांचा एक गट तयार करण्यात आला आहे. इथं देशांकडून वादळांच्या नावांचे पर्याय मागवण्यात येतात. या नावांची एक यादी तयार केली जाते. सध्याच्या घडीला तयार असणारी नावांची यादी ही इतकी मोठी आहे की, चक्रीवादळं कमी आल्यास 3 वर्षे ही नावं पुरेशी असतील. चक्रिवादळांची नावं निर्धारित करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्व पाळली जाणं महत्त्वाचं असतं. यामध्ये कोणत्याही संवेदनशील नावांची निवड केली जात नाही. लिंगभेदी आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱी नावंही टाळली जातात. याशिवाय राजकीय नेते, ऐतिहासिक व्यक्ती यांची नावंही वादळांना देण्यात येत नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या:
Cyclone : अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका; जाणून घ्या कशी ठरवली जातात वादळांची नावं