Cyclone : अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका; जाणून घ्या कशी ठरवली जातात वादळांची नावं
14 ते 16 मे या दिवसांदरम्यान, ताशी 40 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार असून, समुद्रही खवळलेलला असेल.मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
मुंबई : हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्याचं रुपांतर हे चक्रीवादळात होणार असल्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षातील हे पहिलं चक्रीवादळ ठरु शकतं. हवामान खात्याच्या माहितीनुसार 14 ते 16 मे या दिवसांदरम्यान, ताशी 40 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार असून, समुद्रही खवळलेलला असेल. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. आता हवामान खात्यानं दिलेला हा इशारा पाहता अनेकांनीच या चक्रिवादळाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वादळाच्या नावापासून त्याचं स्वरुप नेमकं कसं असणार आणि कोणत्या भागाला याचा प्रभाव जाणवणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.
चक्रीवादळासंबंधीच्या याच प्रश्नांच्या गर्दीत लक्ष वेधून गेलं ते म्हणजे मुंबईच्या हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांचं एक ट्विट. या ट्विटमध्ये त्यांनी वादळांच्या नावांचा क्रम आणि काही रंजक माहिती सर्वांच्या भेटीला आणली आहे. सोबतच यावेळी येणाऱ्या वादळाचं नाव काय असेल बरं, असा प्रश्नही सर्वांनाच केला आहे.
...म्हणून चक्रीवादळांना नावं देण्यास सुरुवात झाली
पूर्वी चक्रीवादळांना नावं दिली जात नव्हती. वादळांच्या तारखांवरूनच ती लक्षात ठेवली जात होती, पण यामध्ये अनेक अडचणी जाणवू लागल्या. त्यातच समुद्रात एकाच वेळी दोन किंवा त्याहून अधिक भागांत चक्रिवादळसदृश परिस्थिती उदभवण्याची शक्यताही नाकारली गेली नाही. अशा परिस्थितीत तारखांचं गणित काहीसं कठिणच होत गेलं. ज्यानंतर जागतिक स्तरावर वैज्ञानिकांनी चक्रीवादळांना नावं देण्याचं ठरवलं, असं हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर एबीपी माझाशी संवाद साधताना म्हणाले.
चक्रीवादळाच्या नावांवरुन बरेच विचार झाले, ज्यानंतर बाहेरील देशांमध्ये वादळांना महिलांची नावं देण्यात आली. पण, वादळाचा थेट संदर्भ हा विध्वंसाशी लावला जात असून, यामध्ये नकारात्मकताच जास्त येते म्हणून यावर आक्षेप घेतला गेला आणि मग चक्रीवादळांना दुसऱ्या नावानं संबोधण्यास सुरुवात झाली.
होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार चक्रीवादळाच्या नावांसाठी दक्षिण आशियायी राष्ट्रांचा एक गट तयार करण्यात आला आहे. इथं देशांकडून वादळांच्या नावांचे पर्याय मागवण्यात येतात, या नावांची एक यादी तयार केली जाते. सध्याच्या घडीला तयार असणारी नावांची यादी ही इतकी मोठी आहे की, चक्रीवादळं कमी आल्यास 3 वर्षे ही नावं पुरेशी असतील.
नावं निर्धारित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वं
चक्रिवादळांची नावं निर्धारित करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्व पाळली जाणं महत्त्वाचं असतं. यामध्ये कोणत्याही संवेदनशील नावांची निवड केली जात नाही. लिंगभेदी आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱी नावंही टाळली जातात. याशिवाय राजकीय नेते, ऐतिहासिक व्यक्ती यांची नावंही वादळांना देण्यात येत नाहीत.
काही दिवसांपूर्वी हवामान खात्यानं जनसामान्यांनाही चक्रीवादळासाठी नावं सुचवण्याचं आवाहन केलं होतं. भारतातर्फे नागरिकांनी सुचवलेल्या या नावांवर एक समिती काम करते आणि मग चक्रिवादळांची नावं निर्धारित केली जातात. सध्याच्या घडीला दक्षिण आशियायी देशांच्या यादीत असणाऱ्या देशाच्या क्रमाप्रमाणे ही नावं दिली जातात. आगामी काळात येणाऱ्या चक्रीवादळाचं नाव हे आधीच ठरलेलं असतं, असं सांगत नॉर्थ इंडियन ओशन म्हणजेच बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंद महासागर या भागात येणाऱ्या चक्रीवादळांची नावं आधीच ठरलेली आहेत हे के.एस. होसाळीकर यांनी स्पष्ट केलं.
New list of Tropical Cyclone names adopted by WMO/ESCAP Panel Member Countries in April 2020, tropical cyclones over North Indian Ocean including Bay of Bengal & Arabian Sea.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 11, 2021
So what could be the name of cyclone likely to form in Arabian Sea around 16 May morning pl. pic.twitter.com/ysxsPaCYAA
यावेळच्या वादळाचं नाव काय?
के.एस. होसाळीकर यांनी ट्विट केलेल्या यादीनुसार तॉते असं सध्याच्या येणाऱ्या संभवित वादळाचं नाव असणार आहे. म्यानमारनं हे नाव दिलं आहे. तॉते म्हणजे एक प्रकारची पाल.
वादळांना दिलेल्या नावांसाठी जागतिक हवामान विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. सोबतच वादळाच्या नावाचा पुन्हा दुसऱ्या वादळासाठी वापर करता येत नाही. एखाद्या वादळाला नाव दिल्यामुळे त्यासंदर्भातील माहिती शोधणं, त्याचा अभ्यास करणं यासोबतच आपत्ती व्यवस्थापन विभागालाही याची मोठी मदत मिळते. चक्रीवादळांच्या नावांमागे त्यांच्या निरिक्षणात सुसूत्रता आणणे हा प्राथमिक हेतू असतो. आहे की नाही हे फार रंजक!