Single Use Plastic Ban : देशभरात आजपासून सिंगल-यूज प्लास्टिक बॅन; 'या' 19 वस्तूंवर बंदी
Single Use Plastic Ban : आजपासून देशात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये प्लास्टिक कटलरीसह एकूण 19 वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.
Single Use Plastic Ban : देशात एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून म्हणजेच, 1 जुलै 2022 पासून देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. याअंतर्गत प्लास्टिकपासून बनवलेल्या अनेक वस्तू बंद केल्या जाणार आहेत. यामध्ये दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींचाही समावेश आहे. नव्या नियमांतर्गत ज्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं त्या वस्तूंची यादी जाहीर केली आहे.
सिंगल यूज प्लॅस्टिक म्हणजे, प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा वस्तू, ज्याचा आपण एकदाच वापर करू शकतो. त्या वस्तूंचा एकदा वापर केल्यानंतर फेकून द्यायच्या असतात. जर या वस्तूंचा वापर सातत्यानं केला, तर मात्र त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. तसेच, यामुळे आरोग्यालाही हानी पोहोचण्याचा धोका संभवतो.
'सिंगल यूज प्लास्टिक'च्या 'या' गोष्टींवर बंदी
- प्लास्टिक कॅरी बॅग, पॉलिथीन (75 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या)
- प्लास्टिक स्टिक असणारे ईअर बड्स
- फुग्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक स्टिक
- प्लास्टिकचे झेंडे
- कँडी स्टिक, आयसक्रीम स्टिक
- थर्माकोल (पॉलिस्ट्रिन)
- प्लास्टिकच्या प्लेट
- प्लास्टिकचे कप
- प्लास्टिकचे ग्लास
- चमचे
- चाकू
- स्ट्रॉ
- ट्रे
- मिठाईच्या डब्ब्यांना लावण्यात येणारा प्लास्टिकचा कागद
- इन्विटेशन कार्ड
- सिगरेटचं पॅकेट
- 100 मायक्रॉनहून कमी प्लास्टिक किंवा पीवीसी बँनर
- स्टिरर (साखर किंवा इतर धान्य मिळणाऱ्या गोष्टी)
जर कोणी Single Use Plastic चा वापर करताना आढळलं तर, त्यांना शिक्षा केली जाईल, असं पर्यावरण मंत्रालयाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. कोणी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करत असेल, तर तुरुंगवास आणि दंड या दोन्ही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षण कायदा (EPA) कलम 15 अंतर्गत एकेरी वापरल्या जाणार्या प्लास्टिकच्या वापरावर कारवाई केली जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, सिंगल युज प्लॅस्टिक (एसयूपी) बनवलं जातंय, आयात केलं जातंय, साठवलं जातंय, विकलं जातंय किंवा बेकायदेशीरपणे कुठेही वापरलं जातंय का? यावर राज्य सरकारे बारीक लक्ष ठेवतील. सध्या FMCG क्षेत्राला या बंदीतून सूट देण्यात आली आहे. पण पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक पर्यावरणाच्या दृष्टीनं योग्य आहे का, याची काळजी घ्यावी लागेल.
भारताबद्दल बोलायचं झालं तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेल्या सर्वेक्षणात असं म्हटलं आहे की, देशात दररोज 26 हजार टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो, त्यापैकी फक्त 60 टक्के कचरा गोळा केला जातो. उर्वरित कचरा नदी-नाल्यांमध्ये मिसळतो किंवा तसाच पडून राहतो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्यानुसार, भारतात दरवर्षी 2.4 लाख टन सिंगल यूज प्लास्टिक तयार होतं. त्यानुसार, प्रत्येक व्यक्ती दरवर्षी 18 ग्रॅम सिंगल यूज प्लॅस्टिक कचरा निर्माण करते.
केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरण बदल मंत्रालयाने 12 ऑगस्ट 2021 रोजी अधिसूचना जारी केली होती. त्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिक साहित्याची निर्मिती, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापर यावर 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे प्रतिबंध लावण्याचे नमूद करण्यात आलं होतं. त्यानुसार 1 जुलैपासून संपूर्ण शहरात मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई केली जाणार आहे. पर्यावरणीयदृष्ट्या महत्वाच्या या निर्णयाला साथ देत शहरातील व्यापारी बांधवांनी मनपाला सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केलं होतं.