निर्भयाच्या गुन्हेगारांना फासावर लटकवण्याची परवानगी द्या, आंतरराष्ट्रीय नेमबाजानं अमित शाहांना रक्ताने लिहिलं पत्र
निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील गुन्हेगारांना फासावर लटकवण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारं पत्र एका आंतराष्ट्रीय ख्यातीच्या नेमबाजानं गृहमंत्री अमित शाह यांना पाठवलं आहे. विशेष म्हणजे हे पत्र तिने स्वतःच्या रक्ताने लिहिलं आहे.
लखनौ : आंतराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंह हिने स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं एक पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठवलं आहे. या पत्राद्वारे तिने निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील गुन्हेगारांना फासावर लटकवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
वर्तिका म्हणाली की, मी गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे की, मला त्या गुन्हेगारांना फासावर लटकवण्याची परवानगी द्यावी. जर मी त्या नराधमांना फासावर लटकवले तर बलात्काऱ्यांना आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना त्याचे भय वाटले. त्यांना कळेल की, एक महिलादेखील त्यांना फासावर लटकवू शकले. असे केल्यामुळे संपूर्ण जगापर्यंत एक चांगला संदेश पोहोचेल
हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर, दिल्लीतील निर्भया गँगरेपच्या दोषींना फासावर कधी लटकावणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु आता निर्भयाच्या सर्व दोषींना फासावर लटकवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील चारही दोषींना पुढील एक-दोन आठवड्यात फासावर लटकवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृह सचिव कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे.
International shooter Vartika Singh: Hanging of the Nirbhaya case convicts should be done by me. This will send a message throughout the country that a woman can also conduct execution. I want the women actors, MPs to support me. I hope this will bring change in society. pic.twitter.com/VQrbpmDgdO
— ANI UP (@ANINewsUP) December 15, 2019
डमीला फासावर लटकवून ट्रायल दिल्लीतील तिहार कारागृहात बंद असलेल्या निर्भया गँगरेपच्या चारही दोषींना फासावर लटकवण्याच्या बाबतीत जेल प्रशासनाकडे अद्याप कोणतंही अंतिम पत्र आलेलं नाही. पण त्याआधीच कारागृह प्रशासनाने आपल्या तयारीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. जर चारही आरोपींना फाशी दिली तर त्यांच्यापैकी सर्वाधिक वजन असलेल्या कैद्याच्या वजनाच्या हिशेबाने एका डमीला फाशी देऊन पाहिलं. डमीमध्ये 100 किलो वाळू भरली होती. डमीला एक तास फासावर लटकावून ठेवलं होतं.
दोषींना फाशी दिली तर, फासावर लटकवण्यासाठी वापरली जाणारी विशेष दोरी त्यांच्या वजनाने तुटणार तर नाही ना, हे पाहण्यासाठी ही ट्रायल घेण्यात आली. कारण 9 फेब्रुवारी 2013 रोजी संसद हल्ल्याचा दोषी दहशतवादी अफजल गुरुला फाशीवर लटकवलं होतं, तेव्हा त्याआधीही त्याच्या वजनाच्या डमीला फाशी देऊन ट्रायल घेतली होती. यावेळी हे प्रकरण चार कैद्यांचं आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाला फाशी देताना कोणतीही जोखीम घ्यायची नाही.
यूपी, महाराष्ट्र, पश्चिम बंगालमध्ये जल्लादचा शोध
"खरंतर फाशी देण्यासाठी जल्लादची आवश्यकता नाही. पण अवश्यकता असल्यास यूपी, महाराष्ट्र किंवा पश्चिम बंगालमधून जल्लाद बोलावला जाऊ शकतो. यासाठीही शोध सुरु केला आहे," असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
जेल नंबर-3 मध्येच फाशीचा तख्त काही दिवसांपासून तिहार जेलमध्ये निर्भयाच्या दोषींना फासावर लटकावण्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे तिचे दोषीही घाबरले आहेत. आता पवनलाही मंडोलीमधून तिहार जेलमध्ये हलवल्याने ही चर्चा अधिक गडद होत आहे. तिहार, रोहिणी आणि मंडोलीपैकी तिहार कारागृहाच्या जेल क्रमांक 3 मध्येच फाशीचा तख्त आहे. तो स्वच्छ करुन ठेवला आहे.
काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण? - सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता. - सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. - त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला. - यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले. - तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं. - दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. - मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.
निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा - पोलिसांनी या प्रकरणात 80 जणांना साक्षीदार बनवलं होतं. - निर्भया गँगरेप प्रकरणात एकूण सहा आरोपी होते. यामध्ये एका जण अल्पवयीन होता. - सहापैकी एक आरोपी राम सिंहने 11 मार्च 2013 रोजी तिहार जेलमध्ये आत्महत्या केली. - ज्युवेनाईल कोर्टाने अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवलं आणि तीन वर्ष बालसुधारगृहात ठेवल्यानंतर 20 डिसेंबर 2015 रोजी सुटका केली. - 10 सप्टेंबर 2013 रोजी फास्ट ट्रॅक कोर्टाने चार आरोपींना दोषी ठरवलं आणि 13 सप्टेंबरला फाशीची शिक्षा सुनावली. - दोषींनी फास्ट ट्रॅक कोर्टाच्या निर्णयाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं. मात्र हायकोर्टानेही 13 मार्च 2014 रोजी चौघांची फाशी कायम ठेवली. निकास प - यानंतर दोषींनी फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2017 रोजी मुकेश, पवन, विनय आणि अक्षय चौघांची फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं. - यापैकी एक दोषी मुकेश कुमारने 9 नोव्हेंबर 2017 रोजी फेरविचार याचिका दाखल केली होती. - आता हे चौघेही तिहार कारागृहात आहेत.