एक्स्प्लोर
राष्ट्रपती निवडणूक : शिवसेनेच्या विरोधाला किंमत उरलीय का?
नवी दिल्ली : भाजपनं राष्ट्रपतीपदासाठी आपला उमेदवार जाहीर केल्यानंतरही शिवसेनेच्या भूमिकेबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. खरंतर याआधीच्या दोन राष्ट्रपती निवडणुकांमध्ये सेनेनं एनडीएच्या विरोधात भूमिका घेतलेली होती. त्यातच काल उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यात सेनेचा कोविंद यांच्याबद्दलचा नकारात्मक सूर दिसलेला होता. पण मुळात शिवसेना राष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत खरंच काही महत्व टिकवून आहे का? या प्रश्नाचं उत्तर सरळसरळ नाही असं आहे. कारण भाजपला उघड पाठिंबा जाहीर करणा-या पक्षांच्या यादीत एनडीएबाहेरच्या पक्षांचाही समावेश आहे. शिवाय ही यादीही बरीच मोठी आहे.
तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस, एआयडीएमके ( अम्मा गट ), बिजू जनता दल या पक्षांनी भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवाय यात एआयडीएमके आणि बिजू जनता दल यांच्या खासदार-आमदारांची संख्याही प्रचंड आहे. त्यामुळे शिवसेनेनं वेगळी भूमिका घेतली तरी एनडीए फारशी अडचणीत येणार नाही. शिवसेनेची या निवडणुकीतली किंमत कशी कमी होतेय, हे लक्षात घ्यायला केवळ बीजेडीचंही उदाहरण पुरेसं आहे. म्हणजे 21 खासदार आणि 63 आमदार असलेल्या शिवसेनेकडे राष्ट्रपती निवडणुकीतली 25 हजार मतं आहेत. पण शिवसेनेच्या या मतांची कसर एकटा बीजेडीच भरुन काढून शकतो. कारण 27 खासदार आणि 117 आमदार असलेल्या बीजेडीकडे तब्बल 36 हजार मतं आहेत. शिवाय प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी यांच्या निवडीवेळी शिवसेनेनं वेगळी भूमिका घेतलेली असली तरी त्यावेळी सेना ही जिंकणाऱ्या बाजूकडे होती. यावेळी संख्याबळानुसार एनडीएचा उमेदवार विजयी होतोय, हे दिसतानाही सेना हारणा-या बाजूकडे जायचा धोका पत्करणार का हा खरा प्रश्न आहे.
शिवसेना सोबत यावी म्हणूनच यूपीएकडून महाराष्ट्रातल्या उमेदवारांची नावं समोर येतायत. शिवाय स्वामीनाथन यांचं नाव पुन्हा जोर धरतंय ते सेनेला चुचकारण्यासाठीच. पण खरंच सेना मोदींना डिवचण्यासाठी विरोधात उभी राहणार का याची उत्सुकता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement