तुमच्या पोटातलं ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र
शिवसेना शिदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पत्र लिहलं आहे. यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Naresh Mhaske letter to Rahul Gandhi : आरक्षण रद्द करण्याची भाषा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? कोण तुम्ही? तुमची बौध्दिक उंची काय? कर्तृत्त्व काय? असे सवाल करत शिवसेना शिदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पत्र लिहलं आहे. राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य 'मोहब्बत की दुकान' नसून शोषित वंचितांचे 'दमन की दुकान' असल्याची सडेतोड टीका नरेश म्हस्के यांनी पत्रात केलीय. तसेच राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी असंही म्हस्के यांनी पत्रात म्हटलंय.
नरेश म्हस्के यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
काँग्रेसच्या दलित आणि बहुजन विरोधी धोरणाचा म्हस्के यांनी लेखाजोखाच मांडला आहे. बरे झाले, तुमच्या पोटातले, परदेशात का होईना, पण ओठांवर आले. तुमचे खरे स्वरुप उघड झाले. तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. तुम्ही ‘मोहब्बत की दुकान’ उघडले आहे, असे म्हणता. पण प्रत्यक्षात ते ‘दमन की दुकान’ आहे. दलित, शोषित आणि वंचितांच्या पोटावर पाय देणाऱ्या सरंजामी बुटांचे दुकान आहे. अमेरिकेत तुम्ही गुर्मीत जे उद्गार काढले, त्यामुळे देशातला दलित तरुण आता खडबडून जागा होईल, असा विश्वास वाटतो असे म्हणत म्हस्के यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
तुमच्या भाषेतून सरंजामी डौल दिसतो
दलित आणि गरीबांशी बोलताना तुमच्या भाषेतून सरंजामी डौल दिसतो. आजच्या भाषेत सांगायचे तर तुमच्यासारख्यांना संपूर्ण देश आणि देशातील जनता ‘बाप का माल’ वाटतो. आयुष्यभर कधी गरीबी आणि विवंचना न पाहिलेल्या श्रीमंताच्या दिवट्या पोरासारखी आपली गत झाली आहे. या शब्दात म्हस्के यांनी गांधींना खडे बोल सुनावले.
चार घटका मनोरंजन एवढेच राहुल गांधींचे राजकारणातले मोल
चार घटका मनोरंजन एवढेच राहुल गांधी यांचे भारतीय राजकारणातले मोल आहे. चार्ली चॅप्लिन आणि जॉनी लीवर यांच्या सारख्या हास्य कलाकारांनींही मान खाली घालावी अशी वक्तव्ये तुम्ही संसदेत केली आहेत. पण आरक्षणावर बोलून तुम्ही मर्यादा ओलांडली असल्याने हा पत्र प्रपंच करावा लागला असल्याचे म्हस्के यांनी नमूद केले आहे.
आरक्षण रद्द करण्याची भाषा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
नरेश म्हस्के यांनी लिहिलेल्या पत्रात गांधी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला आहे. आरक्षण रद्द करण्याची भाषा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हा खरा सवाल आहे. कोण तुम्ही? तुमची बौध्दिक उंची काय? कर्तृत्त्व काय? दलितांना आरक्षण तुम्ही दिलेले नाही, त्यामुळे तुम्ही ते रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली, तेव्हा दलितांना आरक्षणाची गरज असल्याचे नमूद करुन आवर्जून तसा कायदा निर्माण करण्यात सिंहाचा वाटा उचलल्याचे म्हस्के म्हणाले.
आरक्षणविरोधी नेता ही तुमची भविष्यात ओळख बनेल
आरक्षण देणारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जमेल तेवढा दुस्वास काँग्रेसमधील नेहरु समर्थकांनी तेव्हाही केला होता. पंडित नेहरु यांचे आरक्षणाबाबतचे विचार तुम्हाला परिचित असतीलच. नसतील, तर ते वाचून घ्यावेत. आपले पणजोबा, आजी, वडील, आई यांच्या पावलावर पाऊल टाकून तुमची आरक्षणविरोधी वाटचाल सुरु आहे, एवढेच म्हणता येईल. संविधानविरोधी आणि आरक्षणविरोधी नेता ही तुमची भविष्यात ओळख बनेल. याला ओळख म्हणायचे की बदनामी, हे तुम्हीच ठरवा. जमेल तेथे तुमचा धिक्कार करण्याच्या शपथा आता दलित बांधव आणि भगिनी खात आहेत, हे विसरु नका, असे ही म्हस्के यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या: