(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar meets Amit Shah : आज दुपारी शरद पवार घेणार अमित शाह यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Sharad Pawar meets Amit Shaha : आज दुपारी शरद पवार अमित शाह यांची भेट घेणार असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Sharad Pawar meets Amit Shaha : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहमंत्री अमित शाह यांची आज भेट होणार आहे. ही भेट दुपारी दोन वाजता होईल. संसदेतील अमित शाह यांच्या कार्यालयात शरद पवार यांची भेट होणार आहे. सहकाराच्या मुद्द्यावर भेट होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी 17 जुलै रोजी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर 17 दिवसांनी शरद पवार अमित शाह यांची भेट घेणार आहेत.
सोमवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे आणि सुनील तटकरे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली होती. आज सकाळी 14 विरोधी पक्षांसह काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांनी भेट घेतली होती.
सुप्रीया सुळे या बैठकीत राहुल गांधी यांच्यासोबत दिसून आल्या होत्या. परंतु, या बैठकीच्या दोन तासांनीच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट झाली होती. जवळपास 57 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली होती. राजधानी दिल्लीत साऊथ ब्लॉकमधल्या पंतप्रधान कार्यालयात दोघांची भेट झाली होती. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उत आला नसता तरच नवलच. पवार आणि मोदी याआधी भेटले ते नोव्हेंबर 2019 मध्ये ज्यावेळी महाराष्ट्र सरकारच्या स्थापनेच्या घडामोडी सुरु होत्या. त्यावेळी संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात दोघांची भेट झाली होती. त्यानंतर सतरा- अठरा महिन्यानंतर दोघांमध्ये ही भेट झाली आहे. भेटीचा तपशील अजून गुलदस्त्यात असला तरी सहकार आणि बँकिंगसंदर्भातल्या प्रश्नांवर ही चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजतंय. त्यासंदर्भातलं एक सहा पानी पत्रही पवारांनी मोदींना दिलंय. 8 जूनला पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली होती. त्यापाठोपाठ पवारांची दिल्लीत भेट झाली. महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीनंही या भेटीगाठींना महत्व आहे. त्यात पवारांची आजची भेट ही ठाकरेंना पूर्वकल्पना देऊनच झाल्याचं समोर आले आहे.