Savitribai Phule Death Anniversary 2021: सावित्रीबाई 'प्लेगयोद्धा' म्हणून लढल्या अन् त्यातच...
Savitribai Phule Death Anniversary: भारतात स्त्री शिक्षणाचा विचार जेव्हा येतो तेव्हा पहिलं मनात नाव येतं ते म्हणजे सावित्रीबाई फुले. आजच्या कोरोना महामारीच्या काळात प्लेगयोद्धा म्हणून काम करणाऱ्या सावित्रीमाईंच्या महान कार्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
Savitribai Phule Death Anniversary: भारतात स्त्री शिक्षणाचा विचार जेव्हा येतो तेव्हा पहिलं मनात नाव येतं ते म्हणजे सावित्रीबाई फुले. आज सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी. देशातील सर्व राजकीय पक्ष महिलांच्या शिक्षणाबद्दल वेगवेगळे दावे करीत आहेत, पण त्याचा पाया सावित्रीबाई फुले यांनी 19व्या शतकातच घातला होता. सावित्रीबाई फुले समाजसेविका आणि शिक्षिका होत्या. ज्यांनी शिक्षण मिळवून केवळ समाजातील वाईट प्रवृत्तींचाच पराभव केला नाही, तर जेव्हा समाजात अनेक प्रकारचे लिंगभेद होते अशा वेळी भारतातील मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडण्याचे महान काम केले आहे.
प्लेगयोद्धा म्हणून केलं काम
1896-97 सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या.
सावित्रीबाईंनी डॉक्टर यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसरला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणत त्यांच्यावर उपचार केले. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या. प्लेगचं थैमान घेऊन पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली.
प्लेग संसर्गजन्य रोग असल्याची व रुग्णाला आपण स्पर्श केला तर आपल्यालाही तो होऊ शकतो याची माहिती त्यांना मुलगा यशवंतकडून मिळालेली होती. तरीही त्या जीव धोक्यात घालून प्लेगयोद्धा म्हणून लढत होत्या. मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोहोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि 10 मार्च 1897 ला त्यांचं प्लेगमुळे निधन झालं.
आजच्या कोरोना महामारीच्या काळात सावित्रीमाईंच्या महान कार्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
बातमी सोर्स- विकिपीडिया व साहित्यिक हरी नरके यांचा लेख