India Or Bharat Issue: 'भारत' नाव वापरण्यात काहीच गैर नाही, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी थेटच सांगितलं, म्हणाले...
India Or Bharat Issue: G-20 शिखर परिषदेत भारताऐवजी भारत हे नाव लिहिण्यावरून सुरू असलेल्या वादावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सल्ला दिला आहे.
S Jaishankar On Bharat Name Row: देशात भारत विरुद्ध इंडिया (India) अशा वादाला सुरुवात झाली आहे. यावर परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. भारत नाव वापरण्यात काहीच गैर नाही, किंबहुना आश्चर्य वाटण्याचंही काहीही कारण नाही. भारताच्या घटनेत 'इंडिया दॅट इज भारत', असं स्पष्ट नमूद केलं आहे. घटनेतलं हे कलम सर्वांनी वाचावं, असं मी आवाहन करतो, असं परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले आहेत. दरम्यान, G20 परिषदेच्या अधिकृत निमंत्रणपत्रिकेवर पुन्हा एकदा 'भारत' असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरुन काँग्रेसनं प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. तेव्हापासूनच संपूर्ण देशभरात इंडिया विरुद्ध भारत अशा वादाला तोंड फुटलं आहे.
परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं की, "इंडिया दॅट इज भारत' असं घटनेत स्पष्ट नमूद केलं आहे. मी सर्वांना आवाहन करो की, घटनेतलं हे कलम सर्वांनी वाचावं. जेव्हा तुम्ही भारत म्हणता, तेव्हा एक अर्थ, एक समज आणि एक अंदाज येतो आणि मला वाटतं की, हे आपल्या संविधानात देखील प्रतिबिंबित करण्यात आलं आहे."
दरम्यान, काँग्रेस पक्षानं मंगळवारी (5 सप्टेंबर) रोजी जी20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर 'प्रेसिडेंट ऑफ भारत' लिहिल्याचा दावा केला होता. तेव्हापासूनच विरोधी पक्षांनी भाजपला घेरलं आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीचं नावही इंडिया आहे. त्यामुळं विरोधी पक्षांनी असा दावा केला आहे की, इंडिया आघाडीला घाबरुनच 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशिया दौऱ्याबाबात माहिती देत 'प्राईम मिनिस्टर ऑफ भारत' असा उल्लेख केला होता.
विरोधकांवर साधला निशाणा
G-20 परिषदेसाठी सरकारच्या व्यवस्थेवर विरोधक टीका करत आहेत. यावर एस जयशंकर म्हणाले की, जर कोणाला वाटत असेल की, त्यांना लुटियन्स दिल्ली किंवा विज्ञान भवनमध्ये अधिक आरामदायक वाटत होतं, तर ते त्यांचे विशेषाधिकार आहेत. तेच त्यांचं जग होतं आणि मग शिखर बैठका अशा वेळी झाल्या जिथे देशाचा प्रभाव बहुधा विज्ञान भवनात किंवा त्याच्या दोन किलोमीटरच्या आत (लुटियन्स दिल्ली) होता. ते पुढे म्हणाले की, हे वेगळं युग आहे, हे वेगळं सरकार आहे आणि ही एक वेगळी विचारप्रक्रिया आहे.
काँग्रेसचा सत्ताधारी भाजपवर निशाणा
मंगळवारी (5 सप्टेंबर) सकाळी देशाच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या अधिकृत राजपत्रावर प्रथमच प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख केला. त्यानंतर हा देशाच्या नामांतराचा घाट आहे का? अशी पहिली शंका काँग्रेसने उपस्थित केली. खरंतर देशाच्या घटनेच्या पहिल्या कलमात, ज्या वाक्यानं घटनेची सुरुवात होते, त्यात India that is Bharat... shall be union of states असं वाक्य आहे. म्हणजे इंडिया आणि भारत अशी दोन्ही नावं घटनेनंच मान्य केलेली आहेत. पण इंडियाऐवजी भारत असा उल्लेख व्हावा ही संघाची जुनी मागणी आहे.
इंडिया ऐवजी भारत हा बदल ज्या वेळेला होतोय तो टायमिंगही इंटरेस्टिंग आहे. विरोधकांनी बंगळुरुमधल्या दुसऱ्या बैठकीत आपल्या आघाडीचं नाव 'इंडिया' निश्चित केलं. पण या नावाचा उल्लेख न करता 'घमंडिया आघाडी' असाच उल्लेख मोदी करत राहिले. विरोधकांनी त्यांच्या घोषणेत जुडेगा भारत, जीतेगा इंडिया... असे दोन्ही शब्द आणलेत. मात्र अजून इंडिया नावाचं काय होणार हे स्पष्ट नाही.