(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रुद्राक्ष महोत्सवाचं आयोजन करणारे पंडित प्रदीप मिश्रा कोण आहेत? लाखो लोकांनी केली होती गर्दी
Rudraksh Mahotsav : गेल्या वर्षी मार्च महिन्यात सिहोर येथे रुद्राक्ष वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आठ दिवसात 20 ते 30 लाख भाविक येथील अशी अपेक्षा असताना पहिल्याच दिवशी 5 लाख भाविक पोहचले
Rudraksh Mahotsav in Sehore : मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाम येथे एका धार्मिक आयोजनादरम्यान झालेल्या गोंधळामुळे हाहा:कार माजला आहे. तब्येत बिघडल्यामुळे जवळपास हजारो जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर शेकडो महिला भाविक अजूनही बेपत्ता आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकसह अनेक राज्यातील भाविक येथे आले आहेत. नियोजन नसल्यामुळे एकच गोंधळ माजला. वाहनाच्या दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.
कुबेश्वर धाम येथे कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी शिवपुराण कथा व रुद्राक्ष महोत्सवाचं आयोजन केले होते. त्यासाठी हजारो लोक जमले होते. या शिवपुराण कथेची आणि रुद्राक्ष महोत्सवाची तीन महिन्यापासून मिश्रा यांनी जाहिरात केली होती. जो या शिवपुराण कथा ऐकायला येईल त्याला इथूनच एक रुद्राक्ष दिला जाईल आणि हा रुद्राक्ष पाण्यात ठेवून ते पाणी पिल्यास आपल्यावरील सर्व संकट दूर होतात, असा दावाही प्रदीप मिश्रा यांनी केला होता. त्यामुळे देशभरातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जमले होते. देशभरातून आलेल्या जवळपास सहा ते सात लाख भाविक जमले होते. मात्र या ठिकाणी पुरेशी व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यातच चेंगराचेंगरी होऊन हजारो महिला जखमी झाल्या. तर मोबाईल नेटवर्कही कोलमडले. तसेच येथील शेकडो महिला या बेपत्ता झाल्या आहेत. पण कुबेश्वर धाम येथे रुद्राक्ष महोत्सवाचं आयोजन करणारे पंडित मिश्रा आहेत तरी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.. जाणून घेऊयात प्रदीप मिश्रा यांच्याबद्दल...
पंडित प्रदीप मिश्रा कोण आहेत?
पंडित प्रदीप मिश्रा यांना मध्य प्रदेशमध्ये प्रसिद्ध कथा वाचक म्हणून ओळखलं जातं. ते सिहोर जिल्ह्यातील कुदेश्वर धाम येथील आहेत. मागील वर्षभरात पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांची ख्याती जगभर पसरली असून त्यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे रुद्राक्ष मानवी जीवन बदलते आणि पवित्र स्थान असलेल्या सिहोरचे रुद्राक्ष फायदेशीर असल्याचं महाराज सांगत असलेले उपाय आणि प्रवचन होय.
धर्मजागृती आणि संघटनाचे महान कार्य पंडित मिश्रा करत असल्याचे तेथील लोक म्हणतात. गेल्यावर्षी मार्च महिन्यात सिहोर येथे रुद्राक्ष वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आठ दिवसात 20 ते 30 लाख भाविक येथील अशी अपेक्षा असताना पहिल्याच दिवशी 5 लाख भाविक पोहचले आणि गोंधळ उडाला. महामार्ग ठप्प झाले. भाविकांचे हाल होऊ लागले. प्रशासन आणि आयोजकांनी केलेले सर्व नियोजन कोलमडले. नाईलाजाने कथा मध्येच सोडून रुद्राक्ष वाटप स्थगित करीत असल्याचे पंडित प्रदीप मिश्रा यांनी जाहीर केले होते. सलग दुसऱ्या वर्षी सोशल मीडियावर प्रदीप मिश्रा यांचा चांगला प्रचार झाला होता परिणामी या वर्षी गेल्यावर्षी पेक्षा अधिक गर्दी वाढली आणि गोंधळ उडाला.
गेल्या अनेक महिन्यापासून पंडित मिश्रा यांनी शिवपुराण कथा व रुद्राक्ष महोत्सवाचे कँपेन देशभर चालविले. विविध वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रातून मोठ्या जाहिराती व दावे यातून करण्यात आले. मानवी जीवनात प्रत्येकाला संकट असतात आणि या संकटांची मुक्तता कशी करायची, हे महाराजांनी हेरलं आणि दावे केले. त्यामुळे या शिवपुराण कथेला व रुद्राक्ष महोत्सवाला भाविक मोठ्या संख्येने येतील अशी अपेक्षा होती. त्याचप्राणे पहिल्याच दिवशी सात लाख भाविक दाखल झाल्याने गोंधळ उडाला. व्यवस्था अपूर्ण पडली. कुठे अभूतपूर्व वाहतूक कोंडी तर कुठे चेंगराचेंगरी झाली. लाखो भाविक छोट्याशा गावात आल्याने मोबाईल नेटवर्क कोलमडले. अनेक लोक, महिला, लहान मूल बेपत्ता झाले. प्रशासनाने तत्काळ या भागाकडे जाणारे मार्ग बंद केल्याने अजून पुढील अनर्थ टळला. मात्र, आता ता ठिकाणाहून भाविक बिना रुद्राक्ष परत निघत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आसामपासून सर्वच राज्यातील भाविक या ठिकाणी आले होते.
आणखी वाचा :
Kubeshwar Dham Sehore : धार्मिक आयोजनादरम्यान गोंधळ, हजारो लोकांची गर्दी; अनेक महिला बेपत्ता